दिलासादायक बातमी! पेट्रोल, डिझेलच्या दरात लवकरच होणार कपात!

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबात लवकरच ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी क्रूडच्या किंमती कमी झाल्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

तेल विपणन कंपन्या (OMCs) आता दोन्ही इंधनांवर नफा कमावत असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती लवकरच कमी होऊ शकतात, असे वृत्त ET NOWने दिले आहे. ग्राहकांसाठी दिलासा देण्यासाठी सरकारने यावर चर्चा सुरू केली आहे.क्रूडच्या सध्याच्या किंमतींवर वित्त आणि तेल मंत्रालय चर्चा करत आहे. मंत्रालय जागतिक परिस्थिती सोबतचं OMCs च्या नफ्यावर देखील चर्चा करत आहेत.

OMC आता पेट्रोलवर 8-10 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर3-4 रुपये नफा कमावत आहेत. गेल्या तिमाहीतील नफ्यामुळे OMCs चा एकूण तोटा आता कमी झाला आहे. आयओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल या तीन ओएमसींनी गेल्या तिमाहीत 28,000 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्याने महागाई रोखण्यात सरकारला मदत होणार आहे. शिवाय केंद्र सरकारचा विश्वास आहे की क्रूडच्या किंमती प्रति बॅरल 75-80 डॉलरच्या श्रेणीत राहतील.