महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होण्याची शक्यता असून राजभवनात शपथविधीच्या तयारीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता किंवा सायंकाळी 4 वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं असून उद्या नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 12 आणि भाजपचे 21 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे.
एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे जाईल अशी चर्चा होती. पण आता शनिवारी हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. राजभवनावर त्याची तयारी सुरू आहे. नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. मंत्रीपदासाठी निवडलेल्या नावांवर दिल्लीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.