आजपासून 2 जानेवारीपर्यंत देशात ‘राष्ट्रीय दुखवटा’! सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी, 26 डिसेंबर रोजी दिल्लीमधील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झालं.दोन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवणाऱ्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांपासून ते अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे.

दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटक, तेलंगणसारख्या राज्यांनी आज म्हणजेच 27 डिसेंबर रोजी शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. मात्र सात दिवसांच्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला म्हणजे नेमकं काय होणार? आता 2 जानेवारीपर्यंत देशात काय होणार? याबद्दल जाणून घेऊयात…देशातील एखाद्या प्रमुख संवैधानिक पदांवर काम करत असलेल्या किंवा यापूर्वी काम केलेल्या व्यक्तींच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो.

राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानंतर सर्वच शासकीय इमारतींबरोबरच जिथे जिथे सार्वजनिक ठिकाणी असलेले राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवले जातात. राष्ट्रीय दुखवट्याच्या कालावधीत संसदेबरोबरच सर्व सचिवालये, सर्व राज्यांमधील विधानसभा आणि महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जातो. या शिवाय देशाच्या बाहेरील भारतीय दूतावासावरील राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवला जातो.राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेल्या कालावधीमध्ये देशातील सर्व सरकारी इमारतींवरचे राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणले जातात.

प्रत्येक जिल्ह्यात ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकाविण्याची जबाबदारी असलेल्या विभागांना यासंदर्भात सूचना दिल्या जातात. यापूर्वी केंद्र सरकारच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करायचे. मात्र आता राज्य सरकारांनाही दिवंगत व्यक्तीच्या सन्मानार्थ राजकीय शोक व्यक्त करण्यासाठी शासकीय दुखवटा जाहीर करण्याचा अधिकार असतो.

मनमोहन सिंग यांच्या निधानंतर कर्नाटक आणि तेलंगनने लगेच सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. शासकीय तसेच राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात कोणतेही सरकारी किंवा औपचारीक कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत किंवा आयोजित कार्यक्रम पुढे ढकलले जातात.