वन डे वर्ल्ड कप फायनलनंतर कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. तो कुटुंबीयांसोबत सुट्टीवर गेला होता आणि आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुनरागमन करणार आहे.वर्ल्ड कप फायनलनंतर रोहित शर्मा स्पर्धेदरम्यान अनुभवलेल्या आव्हानांबद्दल व्यक्त झाला नव्हता. आज त्याने व्हिडीओ पोस्ट करून भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.”फायनलनंतर, पुन्हा सुरुवात करणे आणि पुढे जाणे खूप कठीण होते, म्हणूनच मी ठरवले की मला माझे मन यातून बाहेर काढायला हवे. पण नंतर मला हे जाणवले की, मी कुठेही गेलो तरी लोकं माझ्याकडे येत आहेत आणि आम्ही किती चांगले खेळलो हे सांगून ते प्रत्येकाच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत. मला त्यांच्या भावना समजत आहेत. ते सर्वजण आमच्यासह वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहत होते, ” असे रोहित म्हणाला.
त्याने पुढे म्हटले की, ”संपूर्ण स्पर्धेत आम्हाला पाठींबा देण्यासाठी ते मोठ्या संख्येने मैदानावर आले होते. शिवाय घरातील टिव्हीसमोर बसूनही अनेकजण आम्हाला चिअर करत होते. त्या दीड महिन्यांच्या कालावधीत जनतेने आमच्यासाठी जे काही केले, याचे मला कौतुक करायचे आहे. पण पुन्हा, जर मी त्याबद्दल अधिकाधिक विचार केला तर मला खूप निराश झाल्यासारखे वाटते की आम्ही स्पर्धा जिंकू शकलो नाही.”
रोहितने सांगितले की चाहत्यांनी त्यांच्यावर शक्य तितका प्रेमाचा वर्षाव केला. “मला पाहण्यासाठी, लोकं माझ्याकडे येत आहेत, मला सांगतात की त्यांना संघाचा अभिमान आहे. त्यांच्या या विधानाने मला बरे वाटते. खेळाडू सध्या कोणत्या दुःखातून जात आहेत, हे ते ओळखतात आणि जेव्हा त्यांना या प्रकारच्या गोष्टी माहित असतात, तेव्हा त्यांच्याकडून राग व्यक्त होत नाही. तेव्हा त्याचा आपल्यासाठी खूप अर्थ असतो, माझ्यासाठी याचा अर्थ नक्कीच खूप आहे. मला भेटलेल्या लोकांचे प्रेम शुद्ध होते. त्यामुळे आम्हाला पुनरागमन करण्याची प्रेरणा मिळते,” असेही तो म्हणाला.
“मी नेहमीच वन डे वर्ल्ड कप पाहत मोठा झालो आहे. माझ्यासाठी ते वन डे वर्ल्ड कप हे अंतिम बक्षीस होते. त्यासाठी आम्ही इतकी वर्षे काम केले,” असेही रोहित म्हणाला.