तळीरामांना बसणार चाप! कोल्हापूर पोलिस ॲक्शन मोडवर

उद्या २०२४ साल संपणार त्यामुळे ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन असतात. नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांकडून जय्यत तयारी आणि नियोजन सुरू आहे. मात्र या सोहळ्याला मद्यपी आणि हुल्लडबाजांकडून गालबोट लावले जाऊ शकते. सर्वसामान्य नागरिकांना अशा समाजकंटकांचा त्रास होऊ नये यासाठी कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आली आहे.थर्टी फर्स्ट साजरा करताना शहराच्या प्रवेशद्वारासह गडकिल्ल्यांवर बंदोबस्त तैनात करणार आहेत. शहराच्या प्रवेश मार्गांसह प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदीद्वारे वाहनांची तपासणी केली जाणार आहे. आजपासून पोलिसांचा बंदोबस्त रस्त्यावर राहणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने गड किल्ल्यांवर मद्यपान करण्यास मनाई केली आहे. मात्र थर्टी फर्स्टच्या निमित्ताने अनेक समाजकंटकांकडून गड किल्ल्यांवर मद्यप्राशन करण्याचे नियोजन केले जाते. मात्र यंदा कोल्हापूर पोलीस हे जिल्ह्यातील पन्हाळा, विशाळगड, गगनगड, सामानगड, पारगड, रांगणा यासह अन्य दोन किल्ल्यांवर पोलिसांचा बंदोबस्तासह पहारा ठेवणार आहेत.यासोबतच हुल्लडबाजांवर कारवाईसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

शहर वाहतूक शाखेच्या मदतीने भरधाव वाहने, कर्णकर्कश हॉर्न, ट्रिपलसीट दुचाकींवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितले. शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व नाक्यांवर चारचाकी वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. अवैध मद्य वाहतूक, अमली पदार्थांची वाहतूक अशांवर कारवाई करण्यात येणार आहे.

रविवारी रात्रीपासूनच ठिकठिकाणी स्थानिक पोलिस ठाण्याकडून तपासणी सुरू करण्यात आली होती.ट्रिपलसीट, सायलेन्सर काढून वाहने पळविणे, भरधाव वाहन चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. प्रसंगी दुचाकी जप्तीच्याही सूचना पोलिसांना करण्यात आल्या आहेत. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ ॲनालायजरच्या मदतीने तपासणी केली जाणार आहे.