निवडणूक निकालांचे सोशल वारे जोरात…

लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदानानंतर कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील निकालाचे वारे सोशल मीडियावर (Social Media) जोरात वाहत राहिले. अनेकांनी या निकालातील विजयी उमेदवार आणि त्यांना मिळणाऱ्या मतांची आकडेमोड शेअर केली आणि त्यावर विविध ग्रुपवर चर्चा रंगली. काही ग्रुपवर तर उमेदवारांच्या छायाचित्रांसह निकालाबाबतच्या मॉर्फ केलेल्या पोस्ट देखील व्हायरल झाल्या.

व्हॉटस्ॲप (WhatsApp), इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जिल्ह्यातील या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांचा प्रचार त्यांचे कार्यकर्ते, समर्थकांकडून जोरात करण्यात आला. त्यात गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे विविध प्रश्न, राजकीय पक्षांची कामगिरी आदी मुद्यांचा समावेश होता. मतदानाचा दिवस जसा जवळ येईल, तसे या प्रचाराचे वातावरण तापले. उमेदवारांबरोबरच त्यांच्या नेतेमंडळींचे मॉर्फ केलेले व्हिडिओ शेअर करण्यात आले.

मतदानाची वेळ संपल्यानंतर ‘झाले इलेक्शन जपा रिलेशन’ अशा स्वरूपातील संदेश काहींनी पोस्ट केले. मतदारांचे आभार मानणारे संदेश अनेकांच्या स्टेटस्‌वर झळकले होते. झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा आधार घेऊन आकडेमोड करून काहींनी निकालच जाहीर केला. त्यात उमेदवारांची छायाचित्रे, त्यांच्या पक्षाचे चिन्ह, त्यांना मिळालेली मते अशी माहिती असलेल्या मॉर्फ केलेल्या विविध पोस्ट व्हायरल झाल्या.