नोकरदार महिलेचा मोबाईल नंबर हॅक करून अकाउंट केले रिकामे….

गुन्हेगारी वाढत चालल्याचे चित्र सध्या सगळीकडे सुरु आहे. खून, मारामारी हे घडत असताना आता फसवणुकीच्या प्रमाणात खूपच वाढ झाली आहे. सध्या मोबाइल नंबर हॅक करून पैसे उडवत अकाउंट रिकामे करण्याचे प्रकार घडत आहेत. हातकणंगले तालुक्यातील अंबप येथे मोबाईल नंबर हॅक करून हॅकर्सने अकाउंटवरील सर्व पैसे उडवत अकाउंट खाली केल्‍याची घटना घडली आहे.

त्‍याचबरोबर सायबर गुन्हेगाराने हॅक केलेल्‍या नंबर वरून गावातील इतर व्हाट्सअप ग्रुपवर पीएम किसानची लिंक म्हणून शेअर करत अनेकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला आहे.सायबर क्राईम विभागात याबाबत तक्रार दाखल झाली आहे. शनिवारी सकाळी अंबप येथील एका नोकरदार महिलेचा मोबाईल नंबर हॅक केला. काही क्षणातच त्या नंबरला असलेला गुगल पे वरून खात्यावरील सर्व रक्कम गायब झाली. यानंतर या नंबरचा वापर करून गावातील वेगवेगळ्या व्यक्तींना व गावातील इतर व्हाट्सअप ग्रुप वर पीएम किसान शी संबंधित लिंक टाकली.


ज्यांनी ही लिंक ओपन केली त्यांच्याही खात्यावरून पैसे उडवण्याचा प्रयत्न केला आहे. यातून किती जणांचे खाते रिकामी झाले याची माहिती मिळू शकली नाही. प्रत्यक्ष तक्रार देण्यास कोणी समोर न आल्याने पण अनेकांनी या लिंकला भेट दिल्याचे चर्चा नागरिकांच्यातून आहे. आपला मोबाईल नंबर हॅक झाल्याची माहिती समजतात संबंधित महिलेच्या पतीने सायबर क्राईमला तक्रार नोंदवली आहे.