गेल्या काही दिवसांपासून जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढताना दिसत आहेत. त्यातच आता भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 85.84 च्या पातळीवर घसरला आहे.त्यामुळे या घसरणीचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. असे असताना पेट्रोल-डिझेलसह खाद्यतेल, डाळी महागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारत परदेशी बाजारातून कच्चे तेल खरेदी करतो. रुपयाच्या घसरणीमुळे पेट्रोलियम पदार्थांची आयात महागणार आहे.
रुपयाच्या घसरणीमुळे आयात महाग झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचा धोका असून, त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. डिझेलच्या किमती वाढल्याने मालवाहतूक वाढेल, त्यामुळे महागाई वाढू शकते. तसेच रुपयाच्या घसरणीमुळे परदेशी शिक्षण महाग होऊ शकते. कारण प्रत्येक डॉलरसाठी अधिक रुपये मोजावे लागतील. याचा परिणाम हजारो भारतीय विद्यार्थी आणि परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढू शकतात. डाळी आणि खाद्यतेल महाग होऊ शकतात. भारत खाद्यतेल आणि डाळींची मोठ्या प्रमाणावर आयात करतो. रुपयाच्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेल आणि डाळींच्या किमती वाढू शकतात. त्याचबरोबर रुपयाच्या घसरणीमुळे परदेशी पर्यटन स्वस्त होऊ शकते, त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. शिवाय, भारतीय निर्यातदारांनाही अधिक नफा मिळेल.