इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून सर्वत्र प्रसिद्धीस आहे. परगावचे लोक नोकरीसाठी येथे येऊन स्थायिक देखील झालेले आहेत. सध्या शहरात अनेक विकास कामे सुरु आहेत. शहरातील घोरपडे नाट्यगृह प्रसिद्ध आहे. शासनाने या नाट्यगृहाच्या नूतनीकरणसाठी ८ कोटींचा निधी मंजूर देखील झालेला आहे. श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहाच्या नूतनीकरणासंदर्भात जेष्ठ सिने व नाट्य अभिनेते प्रशांत दामले, आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी मंगळवारी पाहणी केली. मंजूर झालेल्या या निधीतून दर्जेदार असे नाट्यगृहाचे नूतनीकरण होण्यासाठी अभिनेते प्रशांत दामले यांचे मार्गदर्शन घेण्याचा महापालिका प्रशासनाने निर्णय
घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी दामले यांनी पाहणी केली.
त्यानंतर तांत्रिक बाबींवर विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली. येथील घोरपडे नाट्यगृहाची सुमारे ३० वर्षापूर्वी उभारणी करण्यात आली. १२४० आसन क्षमता असलेल्या या नाट्यगृहातील बहुतांशी यंत्रणा कालबाह्य झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नूतनीकरणाचा निर्णय घेतला आहे. महापालिकेत आयुक्तांच्या दालनात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामाबाबत चर्चा झाली. तसेच आवश्यक तांत्रिक बाबींची माहिती घेवून कांही सूचनाही केल्या. तर इचलकरंजीच्या सांस्कृतिक परंपरेला साजेल असे नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यावर आमचा भर असणार असल्याचे आयुक्त दिवटे यांनी सांगितले.
