तिरुपतीमध्ये वैकुंठ एकादशीनिमित्त शुक्रवारी म्हणजे 10 जानेवारीपासून वैकुंठ द्वार दर्शनाला सुरुवात होत आहे. त्यासाठी देशभरातील हजारो भाविक तिरुपतीला पोहोचले आहेत. या वैकुंठ द्वार दर्शनाच्या तिकिटासाठी प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळं भाविक दोन दिवस आधीपासूनच याठिकाणी आलेले होते. या भाविकांनी बुधवारी सायंकाळपासूनच तिकिटांसाठी रांगा लावल्या.
तिरुपतीमधील बैरागीपट्टेडामधील रामनायडू शाळा परिसर आणि विष्णू निवास केंद्रात तिकिटासाठी उभ्या असलेल्या भाविकांमध्ये आधी धक्काबुक्की आणि नंतर चेंगराचेंगरी झाली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तिरुपतीमधील चेंगराचेंगरीत भाविकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं धक्का बसला आहे असं ते म्हणाले.
तिरुमला श्रीवारी वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकनसाठी भाविक मोठ्या संख्येनं जमले होते. त्यावेळी ही घटना घडली. काही जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. तातडीने बचावकार्य आणि गरजूंना मदतीच्या सूचना दिल्या आहेत असंही नायडू म्हणाले.