दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामन्याला थोड्याच वेळात रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 8 वाजता टॉस होणार आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 1-0 ने आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात डीएलएसनुसार 5 विकेट्सने विजय मिळवला. तर पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आता टीम इंडियासाठी तिसरा सामना हा करो या मरो असा आहे. त्यामुळे टीम इंडियाचा हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र मालिकेचा निकाल हा पूर्णपणे पावसाच्या मर्जीवर अवलंबून आहे. सामन्यादरम्यान हवामान कसं असेल आणि खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर ठरेल हे जाणून घेऊयात.
तिसऱ्या टी 20 सामन्यात जोहान्सबर्गमध्ये हवामान अनुकूल असण्याची आशा आहे. पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. जोहान्सबर्गमध्ये दिवसा 28 डिग्री सेल्सियस तापमान असेल. तर सामना सुरु होईपर्यंत हेच तापमान 26 पर्यंत असण्याची शक्यता आहे. तसेच दुसऱ्या डावात तापमानात घट होईल. तेव्हा तापमान 20 डिग्री सेल्सियस असू शकतं.
टीम इंडियाची वांडरर्स स्टेडियममध्ये विजयी टक्केवारी ही 50 टक्के इतकी आहे. टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये 5 सामने जिंकले आहेत. तर 5 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. तसेच याच मैदानात दक्षिण आफ्रिकेची तिन्ही फॉर्मेटमधील विजयी टक्केवारी ही 65.98 इतकी आहे.
खेळपट्टी कुणाच्या बाजूने खेळणार?
वांडरर्समधील आऊटफिल्ड फार वेगवान आहे. इथे 10 सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या टीमचा 7 वेळा विजय झाला आहे. तसेच पहिल्या डावातील एव्हरेज स्कोअर हा 158 इतका आहे. तर दुसऱ्या डावातील एव्हरेज स्कोअर हा 143 आहे. तसेच या मैदानातील हायस्कोअर 236 इतका आहे. विंडिजने 2014-15 मध्ये चेसिंग करताना या धावा केल्या होत्या. मैदान लहान असल्याने इथे फटकेबाजी पाहायला मिळू शकते.
दक्षिण आफ्रिका 20 टीम | एडेन मार्करम (कर्णधार), बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीटक्जे, नांद्रे बर्गर, डोनोवॅन फरेरिया, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिजाड विलियम्स.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चाहर.