‘बिग बॉस 18’ची ट्रॉफी पटकावण्यासाठी सहा स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. आज या लोकप्रिय शोचा ग्रँड फिनाले पार पडणार असून लवकरच विजेता जाहीर होणार आहे. ‘बिग बॉस 18’ या सिझनच्या सुरुवातीपासूनच करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना हे दोघं तगडे स्पर्धक मानले जात आहेत. मात्र एक्सवरील (ट्विटर) आताचा ट्रेंड पाहता रजत दलाल आणि विवियन डिसेना यांच्यात अंतिम चुरस रंगणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वीर पहारिया त्यांचा आगामी ‘स्कायफोर्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ग्रँड फिनालेमध्ये येणार आहेत. याशिवाय आमिर खान, त्याचा मुलगा जुनैद खान, खुशी कपूरसुद्धा फिनालेमध्ये येणार असल्याचं कळतंय.
‘बिग बॉस 18’च्या विजेत्याला 50 लाख रुपये बक्षीस आणि ट्रॉफी मिळणार आहे. मात्र फिनालेमध्ये ब्रीफकेसची ऑफर दिल्यास बक्षीसाची ही रक्कम कमी होऊ शकते. ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले कलर्स टीव्हीवर रात्री 9.30 वाजल्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास अडीच ते तीन तासांच्या कार्यक्रमानंतर या सिझनचा विजेता सलमान खान घोषित करणार आहे. प्रेक्षकांना जियो सिनेमा आणि जियो टीव्हीवरही लाइव्ह एपिसोड पाहता येणार आहे. आता फक्त सहा स्पर्धक घरात राहिले आहेत. विवियन डिसेना, करणवीर मेहरा, ईशा सिंह, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि रजत दलाल यांपैकी ‘बिग बॉस 18’ची ट्रॉफी कोण पटकावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.