मुख्यमंत्री सुंदर शाळेमध्ये आटपाडी तालुक्यात दिघंची शाळा प्रथम

सध्या शासनामार्फत अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. तसेच भागाभागात अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये प्रत्येक गावांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील पहावयास मिळतो. सध्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत दिघंची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ ने सलग दुसऱ्या वर्षी तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.  ही स्पर्धा भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, इतर सोयी सुविधा यावर आधारित पार पडली. जिल्हा समितीकडून या शाळेची तपासणी करण्यात आली. सर्वात सुंदर शाळा म्हणून या शाळेने लौकिक मिळवला आहे.

आटपाडीसारख्या दुष्काळी तालुक्यात शैक्षणिक दर्जा सुधाराव याकरिता या शाळेने विविध उपक्रम राबविले. हे स्पर्धेअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर मोरे, उपाध्यक्षा स्वाती रणदिवे, केंद्रप्रमुख शिवाजी गवळे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले. त्याची फलश्रुती शाळा तालुक्यात प्रथम येण्यात झाली.