खानापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुहास बाबर, महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील व अपक्ष राजेंद्र देशमुख अशी तिरंगी लढत होती.तिरंगी लढत होत असली तरी दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र वैभव पाटील यांच्यातच अटीतटीची प्रमुख लढती होती.
आटपाडी तालुक्याची अस्मिता म्हणून माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी केलेल्या बंडखोरीला मतदारांनी डावलले. होमपीचवरच त्यांची अनामत जप्त झाली आहे. तिरंगी निवडणुकीत ते आटपाडी तालुक्यातून मताधिक्य घेण्याची चिन्हे होती, पण तसे झाले नाही. देशमुख यांनी निवडणुकीची तयारी अगदी शेवटच्या महिन्यात सुरू केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत उमेदवारीसाठी प्रयत्न केले.
पण त्यात अपयशी ठरल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर सूतगिरणीवर कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. निवडणुकीचा निर्णय स्पष्ट केला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आक्रमक भूमिका मांडत गेली अनेक वर्षे आपण कोणतीच तयारी न करता अचानकच का उभे राहात आहात? पक्षप्रवेश कधी, कसा व का केला? असे प्रश्न उपस्थित केले. कार्यकर्त्यांनाही खडे बोल सुनावले.
माणगंगा कारखान्याचे धुराडे मीच पेटवणार, असे सांगत कारखाना देशमुख कुटुंबाच्या ताब्यात देईल त्यांच्या पाठीशी जाण्याची भूमिकाही जाहीर केली होती. त्यासाठी जयंत पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारखान्याबाबत चर्चा केली होती. त्याचवेळी राजेंद्रअण्णा यांनी उमेदवारी दाखल केली. दुसऱ्याच दिवशी अमरसिंह यांनी राजेंद्रअण्णा यांना निवडून आणण्यासाठी तालुक्यातील उमेदवार, तालुक्याची अस्मिता म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचे निश्चित केले. तालुक्यात राजेंद्रअण्णा यांच्या भूमिकेचे स्वागत झाले. कार्यकर्त्यांचे मोठे बळ मिळाले. गावोगावी जोरदार प्रचार झाला. मतदानही चुरशीने झाले. प्रत्यक्षात मात्र देशमुख यांना अत्यल्प मतदान झाले. त्यामुळे या गटाची नामुष्की झाली. आटपाडीत बाबर व पाटील यांनाच जास्त मतदान झाले आहे.
राजेंद्रअण्णा यांची होमपीचवर अनामत जप्त झाल्याने देशमुख गटाच्या कार्यकर्त्यात नैराश्य निर्माण झाले आहे. आगामी राजकीय वाटचाल खडतर बनली आहे. आत्मचिंतन करून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणुकीत उभारी घेण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत.