छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या हिंदी सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. या धमाकेदार ट्रेलरची सध्या उलट सुलट चर्चा सुरु असताना यावरुनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजी छत्रपती यांनी या सिनेमातील काही सिनेमॅटिक लिबर्टीवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळं सिनेमा चांगलाच चर्चेत आला आहे.लक्ष्मण उत्तेकर हे छावा या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. शिवाजी सावंत लिखित छावा या कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला असल्याचं सांगितलं जात आहे.

या चित्रपटात बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता विकी कौशल यानं छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हीनं महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे.या चित्रपटाचा ट्रेलर २२ जानेवारी रोजी रिलीज झाला तर सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. ऐतिहासिक पात्र आणि घटनांवर आधारित हा सिनेमा असल्यानं त्याच्या ट्रेलरवर चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये बऱ्याच ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेण्यात आली आहे.

पण असं करताना यातील दृश्ये ही चुकीची असल्याचं मत स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे.चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेलं नृत्य हे चुकीचं असल्याचं संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आपण काय दाखवतो याचं भान असलं पाहिजे. उत्तेकर यांनी मी, इतिहास संशोधक आणि आमच्या टीमबरोबर बैठक करण्याबाबत बोललो आहे.
लक्ष्मण उत्तेकर हा मराठी माणूस असून त्यांनी खूपच मोठं धाडस केलं आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊ पण चुकीचं काम होता कामा नये ही अपेक्षा! अजूनही वेळ गेलेली नाही, उत्तेकर यांनी इतिहास संशोधक यांची मिटिंग घ्यावी आणि यात दुरुस्ती करावी, अशी मागणीही यावेळी संभाजी छत्रपती यांनी केली.