सांगोला तालुक्यातील जनतेचे प्रश्न ऑन द स्पॉट सोडवले जाणार…..

लोकसभा विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली प्रत्येकाने पहिलीच आहेत. विधानसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब देशमुख हे प्रचंड बहुमताने निवडून आले आणि त्यांनी आमदारकीचा पदभार स्वीकारला. सध्या त्यांनी विकासकामाबाबत पुढाकार घेत आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक बुधवार दि. २९ रोजी डॉ. भाई. गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर संपन्न झाली.

शेतकरी कामगार पक्षाने आजपर्यंत गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची बांधिलकी जोपासली आहे. सांगोला तालुक्यातील ग्रामीण जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी लवकरच गावभेट दौऱ्याचे नियोजन करण्यात येणार असून गावभेटीचे नियोजन प्रसिध्दीपत्रकाव्दारे प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी या गावभेट दौऱ्यादरम्यान आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक अडी- अडचणी लेखी स्वरूपात मांडाव्यात, असे आवाहन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर सर्वसामान्य जनतेचे आभार मानण्यासाठी व सांगोला तालुक्यातील ग्रामीण जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अधिकारी व पदाधिकारी यांच्यासमवेत लवकरच गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून या दौऱ्यात नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर देणार असल्याची माहिती आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी दिली. 

सांगोला तालुक्यातील विविध गावांमध्ये सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने असणाऱ्या निरनिराळ्या अडचणी, मूलभूत व पायाभूत प्रगतीच्या संदर्भात असणारे प्रश्न आणि समस्या जाणून घेण्यासाठी व त्यावरती आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आ डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे प्रशासकीय अधिकारी, प्रमुख पदाधिकारी यांचे समवेत सांगोला तालुक्यातील नियोजित रूपरेषेनुसार गावभेट दौरा संपन्न होणार आहे.

गावभेट दौऱ्यात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आ. डॉ. बाबासाहेब देशमुख हे ऐकून घेणार आहेत आणि त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्वरित प्रयत्न करणार आहेत. सर्वसामान्य जनता व आमदार यांच्यामधील दरी कमी व्हावी, तळागाळातील समस्या डोळ्याने पाहणे, समक्ष जनतेला भेटून समजून घेणे या प्रामाणिक उद्देशाने आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे ‘आमदार सर्वसामान्य जनतेच्या दारी’ या मोहिमेंतर्गत घरापर्यंत जाऊन नागरिकांना भेटणार आहेत.

पंचायत समिती, नगरपालिका, मंडळ अधिकारी, महावितरण, भुमिअभिलेख, पोलिस स्टेशन, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, उपजिल्हा रुग्णालय आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या समस्या व संबंधित अधिकाऱ्यांना समोरासमोर चर्चा घडवून समस्यांचे निराकरण केले जाणार आहे.


यापूर्वी स्व. भाई गणपतराव देशमुख हे सुध्दा अधिवेशनाच्या पूर्वी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने जनतेशी संवाद साधून प्रश्न जाणून घेत होते. स्व. भाई. गणपतराव देशमुख यांच्या गावभेट दौऱ्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे शेकापचे नवनिर्वाचीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या गाव भेट दौऱ्यामध्ये तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी व पदाधिकारी सोबत असल्याने याही दौऱ्यामध्ये जनतेचे प्रश्न ऑन द स्पॉट सोडवले जाण्याची पूर्ण तयारी करण्यात येत आहे.

पहिल्या दोन दिवसात स्वतः आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व पक्षाचे पदाधिकारी गावात जावून नागरिकांचे आभार मानणार आहेत. एका गणातील गावासाठी तीन ते चार तास देण्यात येणार असून दोन गण एका दिवशी पूर्ण करण्यात येणार
आहेत. स्वागत चिटणीस दादाशेठ बाबर यांनी केले. बैठकीस शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.