खानापूर तालुक्यात शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राच्या उभारणीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील गती देणार चर्चा सुरु

शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा हे तीन जिल्हे येतात. सांगली जिल्ह्यामधील ८७ महाविद्यालये शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित आहेत. यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी व आर्किटेक्ट, औषधनिर्माण शास्त्रे, विधी, शारीरिक शिक्षण महाविद्यालयांमधील विद्यार्थी संख्या ६३ हजार ५७० आहे. सांगली जिल्ह्यातील काही भौगोलिक भाग हा दुष्काळी आहे. या भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी शिवाजी विद्यापीठाचे अंतर हे दूर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भार, वेळेचा अपव्यय आदी गोष्टींचा सामना करावा लागतो.

अनेक महाविद्यालये खानापूरपासून तुलनेने कमी अंतरावर आहेत. सातारा जिल्ह्यातील काही महाविद्यालयांसाठीही खानापूर हे केंद्र अंतराच्या दृष्टीने अतिशय सोयीचे होणार आहे. शिवाय, शिवाजी विद्यापीठावरील जो प्रशासकीय व अन्य कामाचा जो भार आहे, तो कमी केला जाऊ शकेल. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीतील खानापूर तालुक्यात करण्याचा ठराव विद्यापीठाच्या अधिसभेत झाला आहे. त्याला वर्ष उलटून गेले तरीही या उपकेंद्राच्या स्थापनेला गती आलेली नाही.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गतवर्षी सांगलीत विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याचा निर्णय दोन मिनिटांत घेऊ, असे स्पष्ट केले होते, त्यालाही वर्ष उलटले आहे. आता ते स्वतः सांगलीचे पालकमंत्री झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठ उपकेंद्राच्या उभारणीस ते गती देतील अशी अपेक्षा आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे गतवर्षी सांगलीत उद्योग प्रदर्शनासाठी आले असता त्यांनी शिवाजी विद्यापीठाकडून सांगलीला उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव आल्यास दोन मिनिटांत मंजूर करू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्याकडूनही यावर अद्याप हालचाल झालेली नाही. आता पालकमंत्रिपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली आहेत. त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालून हा प्रस्ताव मार्गी लावावा, अशी अपेक्षा आहे.