सध्याच्या काळात गुन्हेगारी प्रकरणात प्रचंड वाढ झालेली आहे. तसेच अवैध धंदे राजेरोसपणे सुरु असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याला तरुणाई बळी पडत आहे. सध्या विट्यातील ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्याने तर वातावरण आणखीनच भयभीत झालेले आहे. विटा येथे वैभव पाटील यांनी पत्रकार परिषदेत ड्रग्ज, गांजा, नशेच्या इंजेक्शन्स कोठून येतात याबाबत शंका व्यक्त केली. ग्रामीण भागामध्ये ड्रग्जचे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोण पसरत नव्हते. आपल्या परिसरात याचे लोण का आले, यावर जिल्हा नियोजन बैठकीत आमदारांनी जागरूकतेने बोलणे गरजेचे होते.
या बैठकीत विविध विकासकामांवर चर्चा होत असताना ड्रग्ज विषयासाठी म्हणून सर्व लोकप्रतिनिधी तसेच सर्व सामाजिक संघटनांच्या लोकांना बोलवून स्वतंत्र चर्चा करायला पाहिजे होती, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांनी केली.
यावेळी किरण तारळेकर, प्रशांत कांबळे, अविनाश चोथे, विनोद पाटील, गजानन निकम, भरत कांबळे, माधव रोकडे, पांडुरंग पवार उपस्थित होते.
पाटील म्हणाले, विट्यातील निवासी शासकीय आश्रमशाळेमध्ये जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. त्या प्रकरणात नाममात्र फक्त मुख्याध्यापकांवर बदलीचे कारवाई झाल्याचे समजले. परंतु त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण भविष्यकाळामध्ये अशी कोणती घटना घडू नये. हा प्रकार ताजा असतानाच विट्यात १४ किलो गांजा सापडल्याचे आणखी एक प्रकरण समोर आलं. ते प्रकरण संपते ना संपते तोपर्यंत ड्रग्जचा साठा कार्वे एमआयडीसीमध्ये सापडला. त्यामुळे ग्रामीण भागात एमडी ड्रग्ज, गांजा, नशेची इंजेक्शन्सचे लोण पसरले आहे.
हे कुठून येतात आणि त्याची पाळेमुळे कुठपर्यंत आहेत, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाच्या पाठीमागे नेमकं कोण आहे. कुणाच्या आशीर्वादामुळे किंवा कुणाचे याला पाठबळ आहे, याची सर्व माहिती जनतेसमोर आली पाहिजे. नवीन पिढी ड्रग्जमुळे कशी बरबाद झाली, हे उडता पंजाब चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या चित्रपटातील कथेप्रमाणे आपल्या खानापूरचा उडता खानापूर व्हायला वेळ लागणार नाही.