अलीकडच्या काळात अनेक चोरीच्या घटना तर घडत आहेत त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीत देखील झपाट्याने वाढ होत आहे अशातच फसवणुकीच्या अधिकाधिक घटना उघडकीस येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंत्री, लोकप्रतिनिधींसह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्यांच्या ओळखीतून महामार्ग वाहतूक शाखेकडे बदली करण्याच्या आमिषाने कोल्हापूर पोलिस दलातील सहा पोलिसांना 13 लाख 60 हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सराईत भामटा मनोज प्रकाश सबनीस (वय 32, रा. जी.के.नगर, तारदाळ, ता. हातकणंगले) याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांचीच भामट्याने फसवणूक केल्याने खळबळ माजली आहे. जयसिंगपूर पोलिस ठाण्यातील हवालदार प्रमोद नरसिंह बेनाडे (51, रा. रुई, ता. हातकणंगले) यांनी भामट्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने रविवारी मध्यरात्री तारदाळच्या घरावर छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या. मंगळवारपर्यंत त्याच्या पोलिस कोठडीचा आदेश झाला आहे. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, राज्यातील काही बडे मंत्री, लोकप्रतिनिधी व वरिष्ठ पोलिस अधिकार्यांशी असलेल्या संपर्कातून यापूर्वी आपण अनेक अधिकारी, पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत, असे त्याने पोलिसांना भासवले. महामार्ग वाहतूक शाखेच्या पथकात बदलीच्या बहाण्याने त्याने फिर्यादीसह अन्य पोलिसांकडून वेळोवेळी रोख, गुगल पे, तसेच परिख पूल येथील एका बँकेतून 13 लाख 60 हजारांची रोकड उकळल्याचे म्हटले आहे.
1 डिसेंबर 2023 ते 31 एप्रिल 2024 या काळात संशयिताकडून फसवणूक झाली आहे. बदलीसाठी पैसे देऊनही काम न झाल्याने त्याच्याकडून रक्कम परत मिळावी, यासाठी तगादा लावला; पण त्याने दाद दिली नाही. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच फसगत झालेल्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संशयित मनोज सबनीससह त्याच्या साथीदाराविरुद्ध यापूर्वी इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे.
या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटकही केली होती, असेही उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी सांगितले. फसवणूक प्रकरणात मोठे रॅकेट चव्हाट्यावर येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. संशयिताने या सहा पोलिसांशिवाय आणखी किती जणांना गंडविले आहे, याचीही सखोल चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.