इचलकरंजी पोलिस ठाण्यात रंगला मध्यस्थीचा कार्यक्रम, समाजमाध्यमातून रंगली चर्चा…..

वस्त्रनगरी म्हणून इचलकरंजीचे नाव प्रसिद्धीस आहेच. त्याचबरोबर येथील पाणीप्रश्न देखील सर्वांच्याच ओळखीचा आहे. तसेच येथील राजकीय वातावरण देखील सर्वांच्या कानी आहे. इचलकरंजी शहरात रविवारी सकाळी आमदारांच्या हस्ते रस्ता उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होते. कार्यक्रमासाठी आमदारांनी वेळेत उपस्थिती लावली होती. मात्र रस्ता उद्घाटन करत असताना साहित्याची उपलब्धता या ठिकाणी नव्हती. शिवाय कोणतीच तयारी केली नव्हती. मात्र या ठिकाणी कोणतीच तयारी नसल्याने आमदारांनी त्याचा जाब नेतृत्व करत असलेल्या माजी नगरसेवकाला विचारला. त्यावर नाराज होऊन आमदारांनी त्या ठिकाणावरून जाणे पसंत केले.

या प्रकारामुळे चिडलेल्या माजी नगरसेवकाने थेट ठेकेदाराच्या श्रीमुखात लगावली. तर उपस्थित समर्थकाने देखील ठेकेदाराला कपडे फाडेपर्यंत मारले. दरम्यान, मारहाण झालेल्या ठेकेदाराने घटनेनंतर पोलीस स्टेशन गाठले. याबाबतची तक्रार देण्यासाठी गेलेल्या ठेकेदाराला फोनवरून आमदारांनी समजूत काढली. ठेकेदार आणि माजी नगरसेवक देखील जवळचे असल्याने त्यांनीच मध्यस्थी केली.

मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा टाकण्यात आला. मात्र, या प्रकाराची जोरदार चर्चा समाजमाध्यमातून रंगली होती. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाचे सहा महिन्यांपूर्वी उद्‌घाटन झाल्याची माहिती समोर येत आहे. काल पुन्हा उद्घाटनाचा घाट घालण्यात आल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यातच मारहाणीचा प्रकार घडल्याने या कार्यक्रमालाही गालबोट लागल्याने चर्चेत भरच पडली.

.