इचलकरंजी शहरात मटका, जुगार अड्डे जोमात सुरू, सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होऊ लागली चिंता

अलीकडच्या काळात अनेक अवैद्य धंदे राजेरोसपणे सुरु असल्याने तरुणाई याला बळी पडत आहे. दिवसेंदिवस या धंद्यात वाढू होत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे तसेच यावर पोलिसांनी वचक बसवावी अशी मागणी देखील सतत होत राहते. इचलकरंजी शहरात दिवसेंदिवस मटका तसेच जुगार अड्डे जोमात सुरू असल्याचे दिसतात. शहरात तसेच शहराबाहेरही मटक्याची खोकी वाढत आहेत. या अवैध व्यवसायाला खाकी वर्दीचा कोणतीही धाक नसल्याने एकप्रकारे पाठबळ मिळत आहे. यामुळेच शहरात सतत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

इचलकरंजी हे कामगार वस्तीचे तसेच झोपडपट्टी असलेले शहर आहे. कामासाठी परराज्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक स्थायिक झाले आहेत. काम करत असतानाच कमी श्रमात अधिक पैसा मिळवण्याच्या नादात कामगार वर्ग मटका, जुगाराकडे वळत आहे. त्यातच तो मिळवलेला पगार घालवून बसतो. शिवाय व्यसनाधीन आणि कर्जबाजारी होतो. कालांतराने तो गुन्हेगारीकडे वळतो. त्यामुळे शेकडो कुटुंब देशोधडीला लागत आहेत. तरीसुद्धा मटका, जुगार अड्डे बंद होत नाहीत, ही विदारक परिस्थिती आहे.

वरिष्ठ पोलिसांनी अधिकाऱ्यांनी मनात आणले तर मटका बंद होऊ शकतो, हे माजी जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी दाखवून दिले होते. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील मटका पूर्णपणे बंद होता. पण अधिकारी बदलून गेल्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जात नाही, यामागचे गुपित मात्र आजही कायम आहे. सध्या शहरात खुलेआम मटका, जुगार अड्डे जोमात सुरू आहेत. शिवाय ऑनलाईन पद्धतीने मटका जोरात सुरू असल्याचे दिसून येते. शहरात आणि शहराच्या बाहेरही आता पान टपऱ्यांच्या नावाखाली मटक्याची खोकी वाढत आहेत. अगदी मुख्य रोडवर आणि वाटेवरच ही खोकी आहेत. मात्र पोलिसांना ती दिसत नाहीत. कोणी तक्रार केलीच तर एखादी जुजबी कारवाई करून दिखावा केला जातो.

पोलीसांकडूनच अवैध व्यवसायाला उघडपणे चालना मिळत असल्याने तक्रार देण्यास कोणी धजत नाही. परिणामी शहरात गुंडगिरी तसेच गुन्ह्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मटका, जुगार अड्ड्यांबरोबरच शहरात नशा करण्यात युवा वर्ग पूर्णपणे गुरफटून गेला आहे. शहापुर पोलिसांनी तारदाळ परिसरात उघड्यावर गांजा ओढताना आठ युवकांना पकडून कारवाई केली. तारदाळ परिसरात ही कारवाई केली असली तरी शहरात देखील रात्रीच्या अंधारात मैदानावर, रिकाम्या जागेत, आडोशाला राहून काही युवक नशा करताना दिसून येतात. मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे दिसते. यामुळे अवैध व्यावसायिकांचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.