BREAKING: मुंबईत GBS मुळे पहिला मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा 8 वर

गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह महाराष्ट्रातील विविध शहरात जीबीएस अर्थात गुईलेन-बॅरे सिंड्रोमनं थैमान घातलं आहे. या आजारामुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांशी रुग्ण हे पुण्यातील आहेत.पुण्यानंतर आता मुंबईत देखील जीबीएसमुळे पहिला मृत्यू झाल्याची बातमी समोर आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असलेल्या 53 वर्षीय रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. वडाळा येथील रहिवासी असलेले 53 वर्षीय रुग्ण बीएमसीच्या बीएन देसाई रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करत होते.

नायर रुग्णालयाचे डीन डॉ. शैलेश मोहिते यांच्या मते, संबंधित रुग्ण बऱ्याच काळापासून आजारी होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण आता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसमुळे मुंबईत पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने मुंबईकरांचं टेन्शन वाढलं आहे.

दुसरीकडे, ज्या रुग्णालयात जीबीएसमुळे पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याच मुंबईतील नायर रुग्णालयात जीबीएसने ग्रस्त असलेल्या एक 16 वर्षांच्या मुलीला देखील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. संबंधित मुलगी पालघरची रहिवासी असून ती इयत्ता दहावीत शिकते. काही दिवसांपूर्वी तिच्यात जीबीएसची लक्षणं आढळून आली. त्यानंतर तिला नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

रविवारी (९ फेब्रुवारी) पुण्यात उपचारादरम्यान एका 37 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. यामुळे पुण्यातील जीबीएसमुळे झालेल्या मृतांचा आकडा 7 झाला. या सात प्रकरणांमध्ये संशयित आणि पुष्टी झालेल्या दोन्ही प्रकरणांचा समावेश आहे. दरम्यान, पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 192 झाली आहे, त्यापैकी 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.