क्रांतिसिंह नाना पाटील यांचा तालुका म्हणून वाळवा तालुका क्रांतिभूमी म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील बहे गावामध्ये EVMच्या विरोधात ठिणगी पडली आहे. EVM ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ऐतिहासिक ठराव गावानं घेतला आहे. इतकंच नव्हे तर सरकारनं याकडं दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा देखील ठराव संमत केलाय. ग्रामसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलेला सदर ठराव हा इस्लामपूरच्या तहसीलदारांना देखील सुपूर्द करण्यात आला आहे.
आमच्या गावातील कोणत्याही संस्थेच्या किंवा सार्वजनिक निवडणुकीत EVM मशीनचा वापर करू नये, आमच्या ग्रामसभेचा अपमान करून EVM मशीन लादली गेली, तर आम्ही बहिष्कार घालू. बहे ग्रामस्थांनी इस्लामपूर तहसीलदारांकडं एकमतानं मंजूर करण्यात आलेला ठराव सुपूर्द केला आहे. सांगलीमधील वाळवा तालुक्यातील बहे ग्राम पंचायतीनं अशी ठाम भूमिका घेतली आहे. या ठरावाची प्रत बहे ग्रामपंचायतीच्या वतीनं इस्लामपूर तहसीलदारांकडे सुपूर्द देखील करण्यात आली आहे.
वाळवा तालुक्यातील बहे हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं जन्मगाव. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारनं ब्रिटिश राजवटीला सळो-की-पळो करून सोडलं होतं. ही या तालुक्याची ओळख मानली जाते. त्यामुळे लोकशाहीच्या संवर्धनासाठी क्रांतिसिंह पाटलांकडून प्रेरणा घेऊन आपण EVM विरोधात पाऊल उचलले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 10 जानेवारी रोजी बहे गावच्या ग्रामपंचायतीनं ग्रामसभेमध्ये एकमतानं EVM वर मतदान घेऊ नये, असा ठराव 10 जानेवारी रोजी तहकूब झालेल्या ग्रामसभेत केला आहे.
क्रांतिभूमीतल्या बहे गावात EVM विरोधात आवाज घुमू लागला आहे. गावातील नागरिक सयाजी पाटील यांच्यासह काही जणांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी EVM विरोधात गावात जनजागृती सुरू केली. बहे गावातील गावातील सयाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी ईव्हीएम विरोधात गावात जनजागृती सुरू केली. जवळपास 350 ग्रामस्थांनी सह्याच्या माध्यमातून आपला विरोध दर्शवला. त्यानंतर ग्रामसभेमध्ये याबाबतचा ठराव करण्याचा निर्णय घेण्यात आला.
10 जानेवारी रोजी गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा पार पडली. या सभेमध्ये EVM ऐवजी मतपत्रिकेवर मतदान करण्याचा ठराव मांडण्यात आला. याबाबत सयाजी पाटील यांनी म्हटलंय, आमच्या गावानं 10 जानेवारी रोजी विशेष ग्रामसभा घेऊन EVM विरोधात ठराव केला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की जगात अमेरिका, जपान या देशांत लोकशाही आहे. भारतात जगातील सगळ्यांत मोठी लोकशाही आहे.अमेरिकेची नुकतीच निवडणूक पार पडली या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आलं. तिथं एक महिना मतदानाची प्रक्रिया सुरू होती. मग अमेरिका जर बॅलेट पेपरवर मतदान घेते, तर मग भारत का बॅलेट पेपर वर मतदान घेऊ शकत नाही ? आज चंद्रावर सोडलेले यान इथे बसवून वळवू शकतो, मग EVM मशीन हॅक होऊ शकत नाही का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे इथून पुढं येणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी एक ग्रामस्थ व भारताचा नागरिक म्हणून केली आहे.
गावातील 300 लोकांच्या सह्यांचं निवेदन सरपंच संतोष दमामे यांना देऊन विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
शेवाळे सांगतात, गावच्या ग्रामसभेत EVMच्या विरोधात तसेच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ज्याला ग्रामस्थांनी एकमतानं पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे EVM वर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना EVMचा अट्टाहास कशासाठी हवा आहे?असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. हे लोकशाहीचा राज्य असेल तर लोकशाही पद्धतीनं केलेल्या मागणीनुसार बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, असं मत उमेश शेवाळे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
ते सांगतात, बहे ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव करण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार ठराव देखील करण्यात आला आहे. तो ठराव प्रशासनाकडं सादर देखील केला आहे. सरकारच्या निर्णयाची आता आम्ही वाट बघत आहोत. बहे गावानं केलेला हा ठराव इस्लामपूरचे तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडं 22 जानेवारी 2025 रोजी सुपूर्द करण्यात आला.
हा ठराव देताना सरकारला इशारा देखील देण्यात आला आहे की यापुढं गावात होणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवरच घ्याव्यात. अन्यथा EVMच्या मतदानावर बहिष्कार घालण्यात येईल.