पत्रिका देण्यासाठी गेले असता काळाचा घाला!

दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली पहायला मिळत आहे. नवखेडे येथील गुरव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नवेखेड (ता. वाळवा) येथील देशपांडे मळ्यानजीक दुचाकीला समोरून टेम्पोने धडक दिल्याने विनोद विलास निळकंठ (वय ४७, रा. कवलापूर, ता. मिरज) हे जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला आहे. अवधूत विष्णू गुरव ( वय ३७, रा. कवलापूर) असे जखमीचे नाव आहे. हा अपघात रविवारी दुपारी घडला.

याप्रकरणी टेम्पो चालक प्रकाश रामचंद्र पाटील (वय ५०, रा. चांदोली वसाहत फाळकेवाडी, ता. वाळवा) याला इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी सकाळी अवधूत व विनोद हे दुचाकी (एमएच १०, डीजे ८३०५) वरून नवेखेड येथील नातेवाईकांच्याकडे गेले होते. तेथून दुपारी नवेखेड वाळवा रस्त्याने निघाले होते. एका मळ्यानजीक समोरून आलेल्या टेम्पोने (एमएच १० सीआर ५०६४) दुचाकीला जोराची धडक दिली.

अवधूत हा रस्त्यावर पडला. डोक्याला, हाता-पायाला गंभीर मार लागला. विनोद हे बाजूच्या नाल्यात पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दोघांना इस्लामपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विनोद यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नवेखेडचे पोलिसपाटील सुभाष ताटे यांनी फिर्याद दिली.