राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही योजना सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत.पण आता सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली असून अनेक महिलांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. योजनेतील पात्र महिलांच्या घरी चारचाकी वाहन असल्याची माहिती मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार असून, यामुळे काही अपात्र महिलांची नावे वगळण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. त्यामुळे आता या महिन्याचा लाभ पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना जाहीर करण्यात आली होती, मात्र, काही महिन्यातच योजनेसंदर्भात काही तक्रारी समोर येऊ लागल्या. त्यानुसार आता निकषांनुसार किती अपात्र महिला या योजनेचा लाभ घेत आहेत, याचा शोध घेतला जात आहे. पहिल्या टप्प्यात महिला लाभार्थीकडील चारचाकी वाहनांची पडताळणी सुरु आहे. अंगणवाडी सेविकांना संबंधित महिलांच्या नावाच्या याद्या दिल्या असून पडताळणीचा अहवाल आठ दिवसांत शासनाला सादर होणार आहे. त्यानंतर उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे वितरित होतील. त्यासाठी मार्च महिना उजाडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे आता लाडक्या बहिणींच्या पडताळणीमुळे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचाही लाभ थांबला आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थी महिलांच्या नावे चारचाकी वाहने आहेत, त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू आहे. त्यासाठी आणखी आठ-दहा दिवस लागतील. त्यानंतर त्याचा अहवाल शासनाला पाठविला जाईल आणि शासन स्तरावरून त्यासंदर्भातील निर्णय होईल, अशी माहिती समोर आली आहे.