विशाल पाटील यांचा मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव!

सांगलीलोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. जिल्हा काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून, त्यांनी विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी मुंबईतील प्रदेश समितीकडे शुक्रवारी केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे सांगलीतून विशाल पाटील हे कॉंग्रेसच्या चिन्हावर मैत्रीपूर्ण लढत देण्याचा प्रस्ताव आहे.

गेल्या १५ दिवसांपासून सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवेसना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना काही दिवसांपुर्वी शिवसेनेत पक्षप्रवेश देऊन उमेदवारी उमेदवारीचे संकेत दिले होते. यावेळी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. मिरजेत गुरुवारी सभा घेऊन उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली.