अपघात कि घातपात? पिकअप खाली सापडून २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

सध्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. घरासमोर खेळत असणाऱ्या २ वर्षीय लहान मुलाच्या अंगावर पिक अप गेल्याने सदरचा चिमुकला मुलगा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची घटना रविवार २३ फेब्रुवारी रोजी कमलापूर तालुका सांगोला येथे घडली आहे.

मागील आठ दिवसांपूर्वी सदर चिमुकल्या मुलाचे वडील व पिक अप चालक यांच्यामध्ये वाद झाला होता. यामुळे आमच्या मुलाच्या अंगावर वाहन घातल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे अपघात की घातपात अशी चर्चा सुरू आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की २३ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास कमलापूर येथे घरासमोर लहान मुलगा वेदांत विलास काळे वय दोन वर्षे हा खेळत होता. शेजारीच राहणाऱ्या  संशयित पिकअप चालक सिगु ज्ञानेश्वर ऐवळे हे पिकअप नंबर एम एच १३ सी यु ५८८४ घरासमोरून काढत होते. यावेळी वेदांत हा पिक अपच्या चाकाखाली आल्याने तो मरण पावला. याबाबत खबर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर अवताडे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसात त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.