सांगोल्यात संजय राऊत यांनी दिले शहाजीबापू पाटलांना आव्हान

सांगोला विधानसभेचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ संजय राऊत यांची काल जाहीर सभा झाली.शहाजी बापूंनी आम्हाला आव्हान देण्यापेक्षा या वेळेला विधानसभेत निवडून येऊन दाखवावे या वेळेला त्यांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झालेले दिसेल, असे संजय राऊतांनी या पत्रकार परिषदेत म्हटले. शहाजी बापू मोठ्या वल्गना करतात, त्यांचं डिपॉझिट राहील की नाही, याबाबत मला शंका आहे. त्यांनी मोठं आवाहन दिलं, राऊतांनी सांगोल्यात येऊन दाखवावं, मी आलोय. आता तुम्ही विधानसभेत पोहोचून दाखवा, हे आव्हान आम्ही देतो.

असले आव्हान देणारे शिवसेनेने गेल्या 50-55 वर्षांमध्ये खूप पाहिले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बहुतांश वेळ पोलीस ठाण्यात आणि कोर्टात हेलपाटे घालण्यात जाईल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एवढे गुन्हे आणि भ्रष्टाचार करुन ठेवला आहे. या खोट्यानाट्या कामांचा तपास करावा लागणार.

त्यामुळे 23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंना खुलासे देण्यासाठी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील. यावेळेला कोणालाही दयामाया दाखवली जाणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते सोमवारी सांगोल्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.