सध्या सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर लाभ होईल. शेत जमिनीला पाण्याचे साधन नसल्यामुळे जमीन विक्रीतून ज्यादा पैशाच्या अमिष दाखवून शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्याचा सपाटा लावल्यामुळे भविष्यात गावाला स्थलांतरित व्हावे लागेल, या भितीपोटी भाळवणी ‘ग्रामपंचायतने घेतलेल्या ग्रामसभेत सौर प्रकल्पाला भविष्यात परवानगी देऊ नये, अशा मागणीचा ठराव केला. सरपंच लक्ष्मण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ११० पेक्षा अधिक ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित होते. विषय पत्रिकेचे वाचन ग्रामपंचायत अधिकारी सानिया तांबोळी यांनी केले.
त्यामध्ये आलेल्या पत्रव्यवहारावर चर्चा करण्याच्या विषयांमध्ये सौरऊर्जा कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्पासाठी परवानगी मिळणे बाबतचा अर्ज सादर केला. त्यावर झालेल्या चर्चेत सौरऊर्जा प्रकल्पामुळे गावातील जमिनीची सपाटीकरण सुरू असल्यामुळे भविष्यात पावसाचे पाणी जमिनीत थांबणार नाही, पाणी आडवा पाणी जिरवा सारखे उपक्रम मातीमोल झाल्यामुळे कायमस्वरूपी दुष्काळी दाहकतेला सामोरे जावे लागेल, सध्या भूजल पातळी खालावलेली आहे,
शिवाय सौर प्रकल्पासाठी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल देखील राखणे अडचणीची होणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी रोजगार निर्मिती कमी असल्यामुळे भविष्यात अशा प्रकल्पाला परवानगी देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
