सांगोल्यात शेतकरी ओळखपत्रासाठी कॅम्प लावून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्याची तहसीलदार यांच्याकडे मागणी

शासनातर्फे अनेक नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. ज्याचा सर्वसामान्य नागरिकांना पुरेपूर लाभ देखील मिळत असतो. सध्या सर्वत्र शेतकरी फार्मर आयडी काढण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांच्यासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढून घ्या, असे आवाहन शासनातर्फे केले आहे.

परंतु, यासाठी तहसीलदारांनी पुढाकार घेऊन फार्मर आयडी नोंदणीला गती देण्यासाठी गावोगावी कॅम्प लावावेत आणि फार्मर आयडीची नोंदणी करावी, अशी मागणी सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेतातील सर्व कामे सोडून फार्मर आयडीसाठी दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. सेतू कार्यालयात हेलपाटे मारून फार्मर ‘आयडीसाठी जादाचे पैसे मोजावे लागत आहेत. शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शेती, पाणी, मशागत आणि जनावरे वाऱ्यावर सोडून शेतकरी नोंदणीसाठी भटकंती करीत आहे.

फार्मर आयडी नसेल तर शेतकऱ्यांना विविध लाभ मिळणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे. हे टाळण्यासाठी शासकीय यंत्रणेद्वारे कॅम्प आयोजित करावेत आणि शेतकऱ्यांच्या ओळखपत्राच्या नोंदणीची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, सचिन धांडोरे, बबन चव्हाण, सचिव दत्तात्रय पवार, समाधान धांडोरे, विनोद चंदनशिवे आदी उपस्थित होते.