रामायण आणि महाभारत संपेल पण मोहिते पाटीलआणि माझा इतिहास संपायचा नाही असे म्हणत सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी टोलेबाजी केली.50 वर्ष झालं निरा उजवा कालव्याच्या चार आणि पाच नंबर फाट्याचे पाणी त्यांनी अडवले असल्याचे म्हणत शहाजीबापू पाटील यांनी मोहिते पाटलांवर टीका केली. तर रणजितसिंह निंबाळकरांनी डाव्याचे पाणी उजव्याला सोडण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला होता असेही शहाजीबापू म्हणाले. त्यामुळं निंबाळकरांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहावं असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
सांगोला तालुक्यात महायुती प्रचारासाठी शहाजीबापू पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांचा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात शहाजीबापू पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी तुफान टोलेबाजी केली. 2014 च्या निवडणुकीवेळी विजयसिंह मोहिते पाटील माझ्याकडे आले होते. दुपारी एक वाजता आले होते, ते सायंकाळी सहा वाजता गेले. त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की मी तुमच्यासोबत आहे. त्यांना पक्षानं तिकीट दिलं, त्यानंतर ते मला पाणी आणू, असं करु तसं करु म्हणाले होते.
सहा तास विजयदादा माझ्याशी गुळापेक्षा गोड बोलल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही दिपकआबा साळुंके पाटील कशाला घेतला? असे सवाल मोहिते पाटलांकडून होऊ लागल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. दिपकआबा साळुंखे माझ्यासोबत नसते तर मी आमदार झालो नसतो असेही शहाजीबापू पाटील म्हणाले. दरम्यान, रणजितसिंह निंबाळकर हाच माणूस सांगोल्याच सोनं करु शकतो. त्यांना मत द्या असेही पाटील म्हणाले.