सांगोल्यातील १३ हजार ९४० लाभार्थीना आयुष्यमान कार्डचे वाटप 

आरोग्य व कुटुंबकल्याण खात्यांतर्गत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत शहरी भाग वगळता तालुक्यातील ६६ हजार ३१ लाभाथ्र्यांपैकी आतापर्यंत १३ हजार ९४० लाभार्थीना आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांनी आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत कार्यालया मधून आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी केले आहे. कार्ड मिळालेल्या लाभार्थ्यांना तालुक्यातील खासगी व सरकारी हॉस्पिटमध्ये पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. तालुक्यातील अजूनही ६६ हजार ३१ पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. तसेच शहरी भागात सुमारे ५ हजार लाभार्थी आहेत.

शहरी भागात रास्त भाव धान्य दुकानात आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे जे राहिलेले लाभार्थी आहेत, त्यांनी ऑनलाइन अर्ज करून ई कार्ड काढून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. सर्वसामान्यांना मोठ्या आजारांचा सामना करण्यात यावा, यासाठी या योजनेची सुरवात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून या योजनेतील लाभार्थीना ऑनलाइन अर्जाद्वारे कार्डची वाटप करण्यात येत आहेत. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी प्रत्येक उपकेंद्रामध्ये तसेच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि स्वतः नागरिकांनी ग्रामपंचायत अथवा आरोग्य उपकेंद्रात जाऊन आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे. आयुष्यमान योजनेत लाभार्थ्यांना ५ लाखांपर्यंत उपचार मोफत मिळतो. यामुळे लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढून योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी केले आहे.