सांगोला – महूद रोडवरील साखर कारखाना कार्यस्थळावरील बगॅस उष्णतेमुळे जळून खाक; लाखोंचे नुकसान

सांगोला तालुक्यातील बाकी शिवणे येथे प्रचंड उष्णतेमुळे धाराशिव साखर कारखाना युनिट-४ च्या ठिकाणी अचानक लागलेल्या आगीत सुट्टे बगॅस जळून खाक झाले. कारखान्याचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, विठ्ठल सह. साखर कारखाना, पांडुरंग सह. साखर कारखाना व सांगोला नगरपरिषदेच्या अग्निशमक बंबाने अवघ्या दोन तासांत आग आटोक्यात आणून पुढील मोठा अनर्थ टळला आहे. याबाबत, फिर्यादी परमेश्वर कदम हे धाराशिव साखर कारखाना युनिट –४ बर सुरक्षा अधिकारी म्हणून कामास आहेत.

बुधवारी दुपारी चारच्या सुमारास ते फॅक्टरी बिल्डिंगच्या मागे गस्त घालीत बगॅसच्या लुज पॉइंटवर गेले असता लूज बगॅसला आग लागल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे यांना दिली असता त्यांच्यासह सुरक्षा अधिकारी विठ्ठल खरात यांच्यासह कारखान्यावरील इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आगीबाबत ११२ नंबरला कॉल करून कळवले असता पोलीस हवालदार बिपीन ढेरे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखाना, पांडुरंग सहकारी साखर कारखाना व सांगोला नगर परिषदेच्या अग्निशमन गाड्या बोलावून घेतल्या.

 तसेच कारखान्यावरील कर्मचाऱ्यांसह अग्निशमक बंबाच्या सहाय्याने दुपारी चार वाजता लागलेली आग सायंकाळी सहाच्या सुमारास आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, या आगीत सुमारे सहा लाख रुपयांचे सुट्टे बगॅस जळून नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत, परमेश्वर मनोहर कदम ( रा. देगाव, ता. पंढरपूर) यांनी फिर्याद दिली आहे.