सांगोला तालुक्यात अनेक नागरिक, विद्यार्थी पक्षी संवर्धनाचे कार्य करीत असल्यामुळे सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चिमण्यांचा वावर आढळून येतो. डॉ. विधीन कांबळे यांच्या प्रयत्नामुळे व प्रेरणेने अनेक लोक पक्षी संवर्धनाच्या चळवळीत सहभागी होत आहेत. आजच्या युवकांनी खऱ्या अर्थाने या चळवळीत सहभागी होण्याची गरज आहे. भविष्यासाठी पर्यावरण जतन करण्याची जबाबदारी आजच्या युवकांनी घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी कर्करोग आणि जैवविविधता याचा संबंध सांगताना सांगितले की, पक्ष्यांची संख्या कमी झाल्यास कीटकांची संख्या वाढते व कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक औषधांचा अथवा कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ही रसायने मानवी शरीरात जातात. ज्यामुळे असाध्य अशा कर्करोगाला लोक बळी पडत आहेत. आपले आरोग्य निरोगी आणि आरामदायी करायचे असेल तर पर्यावरणाचे आणि पक्षी संवर्धनाचे कार्य सर्वांनी हाती घेतले पाहिजे.
कार्यक्रमाचे नियोजन प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ विजय यादव, प्रा. अशांक भोसले, प्रा. सीमा बिचुकले, प्रयोगशाळा परिचर प्रदीप आसबे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसाद लोखंडे यांनी केले तर प्रा. डॉ. विजय गाडेकर यांनी आभार मानले.