समग्र शिक्षा योजनेच्या अंतर्गत राज्यात शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 4860 शिक्षक पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, किरण सरनाईक यांनी राज्यातील दिव्यांग शिक्षक कर्माच्यांच्या समायोजनासंदर्भात प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, या भरती प्रक्रियेसाठी शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि छाननी केली जाईल. त्यानंतर येत्या दीड महिन्याच्या आत सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष शाळा दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून कार्यरत असून, त्यासाठी अधिक पदे उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभागाला पाठवण्यात आल्या आहेत. भविष्यात यासंदर्भात एक समिती नेमली जाणार असून, त्याच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असेही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी संगितले