भारतीय वायुसेनेने (आयएएफ) अग्निवीर हवाई भरती 02/2025 साठी अधिसूचना जारी केली आहे. ज्या तरुणांना वायुसेनेत अग्निवीरवायू म्हणून सामील व्हायचे आहे ते agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.अर्जाचा कालावधी ८ जुलै ते २८ जुलैपर्यंत सुरू असणार आहे. पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार आयएएफ अग्निवीरवायू भरतीसाठी अर्ज करू शकतात. १८ ऑक्टोबरपासून निवड परीक्षा घेण्यात येणार आहे.
किती आहे वयोमर्यादा?
उमेदवाराचा जन्म ३ जुलै २००४ ते 3 जानेवारी २००८ दरम्यान झालेला असावा. उमेदवाराने निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार केल्यास, नामांकनाच्या तारखेनुसार त्याची उच्च वयोमर्यादा २१ वर्षे असावी.
वैवाहिक स्थिती आणि गर्भधारणा
केवळ अविवाहित उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच चार वर्षांच्या सेवा कालावधीत अग्निवीर वायू महिला उमेदवाराने गर्भवती राहू नये. अर्थात अग्निवीर हवाई भरतीनंतर एखाद्या महिलेला नियमित शिपाई म्हणून हवाई दलात सामील व्हायचे असेल, तरी तिला या काळात गर्भवती राहता येणार नाही.
शैक्षणिक पात्रता
विज्ञान विषय : भारतीय हवाई दलामध्ये सामील होण्यासाठी, उमेदवारांनी १२ वी (किंवा समतुल्य) परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच, गणित आणि भौतिकशास्त्र विषयात किमान ५० टक्के आणि एकूणात किमान ५० टक्के गुण मिळाले पाहिजेत. इंग्रजीतही किमान ५० टक्के गुण असावेत.
हवाई दलात सामील होण्यासाठी तुम्ही अभियांत्रिकी (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल / कॉम्प्युटर सायन्स / इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / माहिती तंत्रज्ञान) पदविका अभ्यासक्रम देखील करू शकता. शिवाय, तुमचे अभ्यासक्रम तसेच इंग्रजीमध्ये एकूण गुण ५० टक्क्यांपेक्षा कमी नसावेत. डिप्लोमामध्ये इंग्रजी हा विषय नसेल, तर इयत्ता ११ वी किंवा १० वी (ज्यामध्ये इंग्रजी देखील होते) तुम्हाला इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळाले पाहिजेत.
विज्ञान सोडून इतर विषयांसाठी : भारतीय हवाई दलात सामील होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही विषयात किंवा क्षेत्रात १२ वी (किंवा समतुल्य) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. लक्षात घ्या की एकूण गुण ५० टक्के किंवा त्याहून अधिक असावेत आणि इंग्रजीत किमान ५० टक्के गुण असावेत.
हवाई दलात भरती होण्यासाठी तुम्ही दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रमही करू शकता. या अभ्यासक्रमात तुम्हाला एकूण किमान ५० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमात इंग्रजी हा विषय नसेल, तर इयत्ता ११ वी किंवा १० वी (ज्यामध्ये इंग्रजीही होते) इंग्रजीत किमान ५० टक्के गुण असावेत.