महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर एकमताने अण्णा बनसोडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा सभागृहात केली. त्यानंतर सभागृहाच्यावतीने बनसोडे यांचे अभिनंदन करण्यात आले. तळागाळातील व्यक्तीला संधी प्रसन्न झाल्याचे गौरवोद्गार अनेकांनी काढले. पान टपरी चालक ते आता संविधानिक पदावरची ही झेप अगदीच सोपी नव्हती. त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या कार्याने आणि निवडीने अनेकांना राजकारणात येण्याची आणि नाव काढण्याची नक्कीच प्रेरणा मिळेल.
अजितदादांनी केले कौतुक
“संविधानाने प्रत्येक सामान्य माणसाला मोठे स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची संधी दिली. आज एक पानपट्टी चालक कार्यकर्ता विधानसभेच्या उपाध्यक्षपदी पोहोचतो, याचा सार्थ अभिमान वाटतो. अण्णा बनसोडे यांनी हा प्रवास त्यांच्या अथक मेहनतीने, चिकाटीने आणि निष्ठेने केला आहे. हे यश त्यांचेच नाही, तर प्रत्येक कष्टकरी माणसाचे आहे,” असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काढले.
विधानसभेचे २२ वे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झालेल्या अण्णा बनसोडे यांचे अभिनंदन करताना अजितदादांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. “मी आणि अण्णा बनसोडे अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता ते संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींना न्याय देतील, अशी मला खात्री आहे. ते सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव न करता दोन्ही बाजूंच्या आमदारांसाठी खंबीरपणे उभे राहतील,” असेही मा. अजितदादांनी स्पष्ट केले.
अण्णा बनसोडे झाले भावुक
भावुक होत अण्णा बनसोडे म्हणाले, “मी कधी एक पानपट्टी चालक होतो तेंव्हा स्वप्नही पडले नव्हते की, एके दिवशी मी महाराष्ट्राच्या विधीमंडळात उपाध्यक्ष म्हणून काम करेन. पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची भूमिका पक्षीय राजकारणापेक्षा मोठी आहे आणि ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन.”
“माझ्या निवडीमुळे केवळ माझ्या कुटुंबाला नव्हे तर माझ्या समाजाला, माझ्या मतदारसंघातील प्रत्येक झोपडीत राहणाऱ्या माणसाला वाटत आहे की, ‘होय! आपल्यालाही संधी मिळू शकते, फक्त मेहनत करण्याची तयारी हवी!’ असे बोलताना त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे भाव उमटले.
“हा विजय माझ्या एकट्याचा नाही तर प्रत्येक सामान्य माणसाचा आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कष्टकरी तरुणाला सांगू इच्छितो की, स्वप्न मोठी पाहा कारण संविधानाने तुम्हालाही संधी दिली आहे!” अशा शब्दांत बनसोडे यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
“संविधानाच्या ताकदीचा विजय म्हणजे अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी झालेली निवड! एका सामान्य कार्यकर्त्याने मेहनतीच्या जोरावर, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना हे मोठे स्थान गाठले, ही प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या जिद्दीची, संघर्षाची आणि लोकसेवेच्या निष्ठेची ही कमाई आहे. ते सभागृहाची गौरवशाली परंपरा पुढे नेत सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करतील, याचा आम्हाला विश्वास आहे.” असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.
संघर्षाच्या कहाणीला नवा अध्याय
अण्णा बनसोडे यांच्या निवडीने फक्त त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नव्हे तर सामान्य कार्यकर्त्यांच्या संघर्षाच्या कहाणीला नवा अध्याय मिळाला आहे. हा प्रवास म्हणजे जिद्द, प्रामाणिक मेहनत आणि लोकसंपर्काची ताकद काय करू शकते याचे ज्वलंत उदाहरण आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षपदी विराजमान होताना त्यांनी संपूर्ण जनतेच्या न्यायासाठी कार्य करण्याची ग्वाही दिली आहे.