दोन कोटींची मागणी करत सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण, शाळेत सोडणारा रिक्षावाला निघाला अपहरणकर्ता

दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्यानेच त्याचा साथीदारांसोबत एका सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. मुलाचे अपहरण झाल्याची माहिती रिक्षावाल्यानेच त्यांच्या वडिलांना दिली. त्यानंतर काही वेळेत दोन कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर केवळ तीन तासात अपहरणकर्ता आणि त्याचे साथीदार उघड झाले. मुलाची सुखरुप सुटका झाली.

रिक्षावाल्याने घरी सांगितले मुलास…

डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरातील व्यावसायिक महेश भोईर यांचा मुलगा कैवल्य भोईर हा शाळेसाठी घरातून सकाळी निघाला. मुलगा घरातून निघाला रिक्षा चालक विरेन पाटील याने महेश भोईर यांना माहिती दिली की, कैवल्य याला काही लोक पळवून घेऊन गेले आहे. त्यानंतर थोड्याच वेळात महेश भोईर यांच्या व्हॉट्सअपवर कॉल आला. तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. मुलगा हवा असल्यास दोन कोटी रुपये द्या. याची माहिती महेश यांनी लगेचच मानपाडा पोलिसांना दिली.

पोलिसांनी तयार केली पाच पथके

डोंबिवलीचे पोलीस अधीक्षक सुहास हेमाडे यांच्या नेतृत्वाखाली मानपाडा पोलिसांनी पाच पथक तयार करत तपास सुरु केला. मुलाचा शोध सुरु झाला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलगा कैवल्य याला शहापुरातून शोधून काढले. पोलिसांनी तीन तासांच्या आत शहापूर येथून लहान मुलाची सुटका करीत चार आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. कैवल्यचा जीव वाचल्याने त्याच्यासह त्याच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

चार जणांना अटक

पोलिसांना रिक्षा चालक विरेन पाटीलवर संशय होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांचा खाक्या दाखविला असता त्याने अपहरण प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली. कैवल्य कोणालाच ओळखत नव्हता. तपास सुरु झाली तेव्हा कैवल्यला दुसरे तिसरे कोणी नाही तर शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्याने सहकाऱ्यांच्या मदतीने अपहरण केले. या अपहरणात विरेन पाटील, संजय मढवी आणि अन्य तीन अल्पवयीन मुले सामील आहेत. सध्या संजय मढवी आणि विरेन पाटील याच्यासह पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरु केला आहे.

तीन तासाच्या आत पोलिसांनी मुलाची सुटका केल्याने त्याचा जीव वाचला. डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे, मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांनी पोलीस निरिक्षक राम चोपडे, दत्तात्रय गुंड यांच्या नेतृत्वात चार तपास पथके तयार केली.