महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. त्यानंतर राज्य सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या घोषित करण्यात आल्या. या समित्यांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांना पक्षाचे अजित पवार यांनी स्थान दिले नाही. वाल्मिक कराडमुळे वादग्रस्त ठरलेले माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना विधिमंडळाच्या कोणत्याही समितीत राष्ट्रवादीने स्थान दिले नाही. यामुळे अजित पवार या दोन नेत्यांपासून चार हात लांबच राहत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, समित्यांमध्ये का स्थान मिळाले नाही, त्याचे उत्तर छगन भुजबळ यांनी दिले आहे.
अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला आहे. भुजबळ यांना मंत्रिमंडळातही स्थान दिले नाही. त्यानंतर छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केल्यानंतर अजित पवार यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले. परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले. त्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले.
मी उपमुख्यमंत्री राहिलो आहे…
आता विधिमंडळाच्या समित्या जाहीर झाल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील नवीन आमदारांना स्थान दिले आहे. परंतु छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना स्थान दिले नाही. त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, दर वेळेला अशा समित्या होत असतात. त्यात प्रत्येक आमदारांना स्थान मिळत नाही. विधिमंडळात सभासद किती आहेत. त्यात धनंजय मुंडे अन् मी मंत्री राहिलो आहेत. मी तर राज्याचा उपमुख्यमंत्री राहिलो आहे. सगळ्यात सिनियर आमदार आहे.
आता परत कशाला खाली यायचे. या समित्यांमुळे वेगवगेळया प्रश्नांना न्याय देता येतो. परंतु वरिष्ठ लोकांना त्यात स्थान मिळेल, असे नाही. सुधीर मुनगंटीवार यांना कुठे समितीमध्ये स्थान दिले आहे? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला. अजित पवार यांनी वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर त्या ठिकाणी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता होती. परंतु पवार यांने मुंडे यांचे खाते स्वतःकडेच ठेवले आहे. भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिपदापासून लांब ठेवले. त्यामुळे भुजबळ पुन्हा नाराज झाले आहे.