पंचगंगा नदीच्या पूर पातळीत संथगतीने वाढ सुरू! प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर धुवाँधार पाऊस सुरू आहे. दिवसभर कोसळणार्‍या पाऊसधारांमुळे नागरिकांची त्रेधा उडत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी (जोतिबा डोंगर), पडळ, बाजारभोगाव, मलकापूर, आंबा, कडगाव, चंदगड, नारंगवाडीसह 13 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झालीयामुळे पंचगंगा नदी रात्री 9 वाजता 36 फूट 6 इंचांवर पोहोचली होती. पावसाचा जोर कायम असला, तरी पंचगंगा नदीच्या पूर पातळीत संथगतीने वाढ सुरू आहे. गायकवाड वाड्याकडून शिवाजी पुलाकडे जाणार्‍या रस्त्याला पंचगंगेचे पाणी लागले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली असून, त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. दरम्यान, संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शनिवारीही कायम होता. शहरात दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. सखल भागात पाणी साठल्याने नागरिकांना कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. शनिवारी कोगे-कुडित्रे पुलावर पाणी आल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.