मंगळवेढा शहर परिसरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी

मंगळवेढ्यासह ग्रामीण भागात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरा आली. करण्यात शहरामध्ये सायंकाळच्या दरम्यान शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत पुरुष व महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. मंगळवेढा शहरातील अनेक ठिकाणी राम मंदिरात व ग्रामीण भागातील हनुमान मंदिरात दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ग्रामीण भागात भजनाचे व आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करून या सोहळ्याची सांगता झाली. 

शहरांमध्ये सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान सांगोला नाका, शनिवार पेठ, होनमाने गल्ली, आठवडा बाजार, शिवप्रेमी चौक, दामाजी चौक, चोखामेळा चौक, मुरलीधर चौक मार्गावरून प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये बँजो, बँड, डीजे व अन्य पारंपरिक वाद्यांचा सहभाग होता. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजपचे जिल्हा संघटन चिटणीस शशिकांत चव्हाण, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, संतोष मोगले, राजेंद्र सुरवसे, उबाठा शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, वारी परिवाराचे सतीश दत्तू, प्रा. विनायक कलुबर्मे, अरुण गुंगे आदींसह रामभक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.

या शोभायात्रेच्या मार्गावर गौरीशंकर बुरकुल, डॉ. शरद शिर्के यांनी रामभक्तांना सरबताचे वाटप केले तर काही ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळी काढून रस्ते स्वच्छ ठेवण्यात आले होते. शहरातील विविध मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सप्तशृंगी मंदिरात खंडोबा गल्ली येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती.