मंगळवेढा पोलिस ठाणे येथील दाखल असलेले अर्ज चौकशीवरून भविष्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांतून नाव कमी करण्यासाठी तसेच इतर नातेवाईकांना गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामिनासाठी दहा लाखांपैकी पाच लाखांची लाच स्वीकारताना मंगळवेढा पोलिस ठाण्यातीन दोन पोलिस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगलीतील पथकाने रंगेहात पकडले. पोलिस हवालदार महेश राचाप्पा कोळी (वय ४३, रा. निंबर्गी, कंदलगाव रोड, सिद्धारूढ मठाच्या मागील शेतामध्ये, ता. दक्षिण सोलापूर) व पोलिस शिपाई वैभव रामचंद्र घायाळ ( वय ३२, रा. गोपाळपूर शिवाजीनगर, सूर्यवंशी किराणा दुकानाजवळ, पंढरपूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ज्या पोलिस ठाण्यात कार्यरत होते, त्याच मंगळवेढा पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
