मुंबईत अनेक सेलिब्रिटींचे आलिशान हॉटेल आहेत. अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिचे देखील मुंबईत ‘टोरी’ नावाचं आलिशान हॉटेल आहे. गौरी खानच्या हॉटेलमध्ये अनेक जण आकर्षण आणि स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी जात असतात. पण गौरी खानच्या हॉटेलमध्ये भेसळयुक्त जेवण मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नुकताच, एका इन्फ्लुएन्सरने मुंबईतील अनेक सेलिब्रिटींच्या हॉटेलमध्ये जाऊन पदार्थांचं परीक्षण केलं. ज्यामध्ये गौरी खानच्या हॉटेलमध्ये भेसळयुक्त पनीर मिळत असल्याचा दावा इन्फ्लूएन्सरने केला आहे. सध्या सर्वत्र इन्फ्लूएन्सरने पोस्ट केलेल्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर सार्थक सचदेवा मुंबईतील काही सेलिब्रिटींच्या हॉटेलमध्ये गेला. जेथे त्यानं भेसळयुक्त पनीर आणि भेसळमुक्त पनीर कोणत्या हॉटेलमध्ये मिळतं याबद्दल सांगितलं आहे. सर्वप्रथम सार्थक आयोडीन टिंचर घेऊन क्रिकेटर विराट कोहली याच्या 8 कम्यून, अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बॅस्टियन आणि अभिनेता बॉबी देओल याच्या सम प्लेस एल्स हॉटेलमध्ये गेला आणि त्याने पनीरच्या तुकड्यांचं परीक्षण केलं.
सार्थक याने सर्वाआधी पनीरला लागलेला मसाला, तेल सर्व काही स्वच्छ पाण्यात धुतलं आणि परीक्षण केलं. ज्यामध्ये वरील कोणत्याच सेलिब्रिटीच्या हॉटेलमध्ये भेसळयुक्त पनीर सार्थकला आढळलं नाही. पण गौरी खानच्या हॉटेलमधील पदार्थांबद्दल धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
सार्थक याने ‘टोरी’ हॉटेलमधील पनीरचं परीक्षण केल्यानंतर आयोडीनच्या संपर्कात येताच पनीर काळा पडल्याचं आढळलं. व्हिडीओमध्ये सार्थक म्हणाला, ‘शाहरुख खानच्या हॉटेलमध्ये भेसळयुक्त पनीर मिळत आहे… हे पाहून मला तर मोठा धक्का बसला आहे.’ सध्या सार्थकचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.