हार्ट अटॅक आल्यावर स्टेंटचा वापर का करतात; हे स्टेंट शरीरात कश्याप्रकारे काम करते ?

हृदयरोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि अनेक रुग्णांना योग्य रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी स्टेंटचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. हृदयाच्या आजारात स्टेंटचा वापर करण्यात येतो. हा बॅालपेनच्या स्प्रिंगच्या आकारासारखा असतो आणि आकुंचन पावलेल्या आर्टरीला दीर्घकाळ उघडी ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो, अशी माहिती डॉ. बिपीनचंद्र भामरे, कन्सल्टंट कार्डियाक सर्जन यांनी दिली आहे.

बैठी जीवनशैली, आहाराच्या चूकीच्या सवयी, ताणतणाव आणि अनुवांशिक घटकांमुळे सर्वच वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराच्या समस्या वाढत आहेत. कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) सारख्या परिस्थिती, जिथे रक्तवाहिन्या ब्लॉक होतात किंवा अरुंद होतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि जीव गमवावा लागू शकतो. ब्लॉक केलेल्या धमन्यांसाठी सर्वात प्रभावी वैद्यकीय उपचार एक म्हणजे स्टेंट्सचा वापर करणे. अनेक लोकांना स्टेंटबद्दल भिती आणि गैरसमज असल्याचे दिसून येते.

कोणत्या समस्यांसाठी स्टेंटिंग आवश्यक आहे?

कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) असलेल्या रुग्णांसाठी सामान्यतः स्टेंटचा वापर केला जातो. धमन्यांमध्ये ब्लॉक होऊ नये यासाठी स्टेंटची मदत होते. अनेक कार्डियोलॉजिस्ट अँजिओप्लास्टी करताना स्टेंटचा वापर करतात. धातूच्या अतिसूक्ष्म, जाळीदार कॉइल्स म्हणजेच स्टेंट या रक्तवाहिनीच्या उघडलेल्या भागामध्ये टाकल्या जातात. ब्लॉकेज होऊ नये आणि रक्ताभिसरण व्यवस्थितपणे सुरु राहावे यासाठी स्टेंटचा वापर केला जातो. स्टेंटिंगमुळे लक्षणे कमी करता येऊ शकतात आणि भविष्यातील गुंतागुंत टाळता येऊ शकते. त्याचप्रमाणे, हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान किंवा नंतर, रक्तपुरवठा पुनर्संचयित करण्यासाठी आणि हृदयाला होणारे भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी स्टेंट बसवता येतो. पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD) असलेल्यांमध्ये देखील तज्ञ स्टेंटिंगचा पर्याय सुचवतात. काही प्रकरणांमध्ये, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी शरीराच्या इतर भागांमध्ये, जसे की पायांमध्ये अरुंद रक्तवाहिन्यांवर उपचार करण्यासाठी स्टेंटचा वापर केला जाऊ शकतो.

स्टेंटिंगचे फायदे :

रक्तप्रवाह संतुलित करणे : स्टेंट्स ब्लॉक केलेल्या धमन्या उघडण्यास मदत करतात, ज्यामुळे ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत कार्यक्षमतेने पोहोचते आणि रक्त पंपिंग करण्याची क्रिया सुरळीतपणे होते

हृदयविकाराचा झटक्याचा धोका रोखते : धमन्या उघड्या ठेवून, स्टेंट्स जीवघेण्या हृदयविकाराचा धोका कमी करतात

छातीत दुखण्यापासून आराम मिळतो : गंभीर एनजाइना असलेल्या रुग्णांना स्टेंटिंग प्रक्रियेनंतर तात्काळ आराम मिळतो.

स्टेंटिंगनंतर कोणती काळजी घ्याल?

गुंतागुंत टाळण्यासाठी रुग्णांना तज्ञांच्या सल्ल्यानुसार रक्त पातळ करणारी आणि कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधांचे सेवन करणे आवश्यक आहे. ही औषधे मध्येच घेणे थांबवू नका. निरोगी व पोषक आहार घ्या. प्रक्रिया केलेले अन्नाचे सेवन टाळा. फळे, भाज्या, तृणधान्य आणि प्रथिनांच्या सेवनाने धमनीचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. चालणे किंवा योगासारख्या शारीरिक हालचाली केल्यानेही हृदयाचे आरोग्य चांगले राहते. पुरेशी झोप घेतल्याने हृदयावरील ताण कमी होऊ शकतो. हृदयाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि स्टेंट योग्यरित्या कार्य करत आहे याची खात्री करण्यासाठी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी तज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.