एकही पाकिस्तानी राज्यात राहू नये; अमित शहांची मुख्यमंत्र्यांना सूचना

भारत सोडून जाण्यासाठी देण्यात आलेल्या मुदतीनंतर आपापल्या राज्यात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही याकडे काटेकोर लक्ष द्या, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शुक्रवारी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना स्वत: फोन करून दिल्याचे सूत्रांनी सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत सोडून जाण्याचे आदेश केंद्र सरकारने बुधवारी दिले.

ही मुदत शुक्रवारी संपत असताना, भारतात आलेले एकूण १९१ पाकिस्तानी नागरिक पंजाबच्या अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवरून त्यांच्या देशात परतले. पहलगाममधील बैसनर खोऱ्यात मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २४ पर्यटकांसह २६ जण ठार झाले. या दहशतवाद्यांना पाकिस्तानची फूस असल्याचे समोर आल्यानंतर २७ एप्रिलपासून पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व व्हिसा रद्द करण्याची घोषणा भारताने गुरुवारी (२४ एप्रिल) केली. भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्यापार, परिषद, पर्यटक, समूह पर्यटक, यात्रेकरू, चित्रपट, पत्रकार, पारगमन, गिर्यारोहण, विद्यार्थी यांसह १४ प्रकारचे व्हिसा रद्द केले आहेत. भारताच्या या निर्णयानंतर गुरुवारपासून पाकिस्तानी नागरिक अमृतसरमधील अटारी सीमेवरून मायदेशी परतू लागले आहेत.

पहलगाम हल्ला दोन्ही देशांमधील तणाव वाढला असल्याने पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारतीय नागरिकांना लवकरात लवकर परतण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. वैध कागदपत्रांसह पाकिस्तानात गेलेल्या भारतीय नागरिकांना अटारी सीमेवरून १ मेपर्यंत परत येता येईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपर्यंत २८७ भारतीय नागरिक अटारी सीमेवरून परतले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवून त्यांच्या परतपाठवणीची खात्री करा, असे गृहमंत्री शहा यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. हिंदू पाकिस्तानी नागरिकांना आधीच दिलेला दीर्घकालीन व्हिसा रद्द होणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

‘अधिक काळ राहणाऱ्यांवर कठोर कारवाई’

‘महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, प्रत्येक पोलिस ठाण्याला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक ४८ तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. अधिक काळ वास्तव्य करताना आढळणाऱ्यांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिशानिर्देशानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी म्हणाले.

पाकला गोळीनेच प्रत्युत्तर

पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर गुरुवारी रात्री काही ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने प्रभावी प्रत्युत्तर दिले. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

धर्म विचारला का मला माहीत नाही – पवार

पहलगाममधील दहशतवाद्यांनी पर्यटकांना मारण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला होता, या वृत्ताची सत्यता आपल्याला माहिती नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सांगितले. दहशतवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केले. त्यांना धर्म विचारला, असे बचावलेल्यांनी संगितले. या विधानांबद्दल विचारले असता पवार यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘सत्य काय आहे हे मला माहीत नाही. पवारांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पीडितांचे कुटुंबीय आणि घटनास्थळी उपस्थित असलेले लोक काय म्हणाले ते मी ऐकले आहे. पवारांनीही त्यांचे ऐकले पाहिजे.’

पाक संरक्षणमंत्र्यांकडून कुकृत्यांची कबुली

काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरोधात भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहेत. त्यातच पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी एका मुलाखतीत त्यांच्या कुकृत्यांची कबुलीच दिली आहे. पाश्चात्य देशांसाठी दहशतवादी संघटनांना पाठिंबा, प्रशिक्षण आणि निधी पुरवठा करीत असल्याचे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी मान्य केले. पाकिस्तानला या कारनाम्यांमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे, असे त्यांनी नमूद केले.

दहशतवाद्यांचा साथीदार ठार

जम्मू-काश्मीरमधील बंदीपोरा जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांचा साथीदार ठार झाला, तर दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. बाजीपोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम सुरू केली. यावेळी तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला, त्यानंतर चकमक झाली.
किशोरी तेलकर
लेखकाबद्दल