विधानसभेनंतर महाविकास आघाडीचं सरकार आल तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं नसताना जागावाटप आणि निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या आधीच महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्न चांगलाच पेटलाय.
तर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शिवसेनेकडून नो डाऊट मुख्यमंत्रीपदासाठी नाव असेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं. या आधीच त्यांनी 2019 पासून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाचा अनुभव त्यांच्या पाठीशी राहिलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदावर असतानाच शिवसेनेची फूट होऊन भाजपच्या मदतीने शिंदे मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून महाविकास आघाडी शिंदे आणि भाजपाला तगडा मेसेज देऊ शकते.
काँग्रेस बद्दल बोलायचं झालं तर काँग्रेसला महाराष्ट्रात जी काही नवसंजीवनी मिळाली त्यात नाना पटोले यांचंही योगदान महत्त्वाचं आहेच. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीची अपेक्षा त्यांनीही नकळतपणे का होईना अनेकदा बोलून दाखवलीय. त्यात विदर्भात काँग्रेसला लोकसभेला मिळालेलं यश पाहता काँग्रेस विधानसभेलाही उत्तम कामगिरी करेल, असा सध्या अंदाज आहे. असं झाल्यास नाना पटोले यांच्याच नावाचा काँग्रेसकडून सर्वप्रथम विचार केला जाईल.
लोकसभेला सामोरे जात तब्बल आठ जागांवर दणदणीत विजय मिळवून दाखवण्याची किमया केलेला पक्ष म्हणून सध्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे पाहिले जाते.
सहानुभूतीची लाट आणि राजकारणाचे डावपेच माहीत असल्यामुळे तुतारीला विधानसभेलाही जास्तीत जास्त आमदार निवडून आणता येतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे… त्यामुळे अजित पवार गटाला प्रत्युत्तर द्यायचं असेल तर राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरला जाऊ शकतो…तेव्हा यात पहिलं नाव येईल ते म्हणजे जयंत पाटील यांचे.
शरद पवारांची सगळ्यांनी साथ सोडली. पण जयंत पाटलांनी आपला निष्ठेचा हात कायम शरद पवारांच्या सोबत ठेवला. अगदी त्यांच्या फुटण्याच्या अनेक वावड्या उठल्या पण निष्ठा कशी असते हे सिद्ध करून दाखवलं ते पाटलांनीच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजितदादांनी फूट पाडल्यानंतर पक्ष उभा करण्यापासून ते प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीत फ्रंटला राहून काम करत होते.
बाकी महिला नेतृत्व म्हणून राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याचा विषय आलाच तर सुप्रिया सुळे यांना दिल्लीतून राज्यात लॉन्च केलं जाऊ शकतं.