इचलकरंजी
गांजा या अंमली पदार्थाचीविक्री करणाऱ्या व तो विकत घेणाऱ्या इचलकरंजी, सांगली, सातारा सोलापूर येथी ८ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने गजाआड केले आहे. याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
या कारवाईत दिपक दत्तात्रयपुजारी (वय ३७), विवेक मेघदुत शिंदे (वय २८ दोघे रा.इचलकरंजी), अंकुश प्रताप शिंदे ( वय ३०), नंदकिशोर भिकु साठे (वय ३० दोघे रा. बामणी ता. खानापुर जि. सांगली), मनोज मदन गोसावी (वय २९), राजु अि शेख (वय ३० दोघे रा.अकलुज, जि. सोलापुर) महेश जम्मु साळुंखे (वय ३२ रा. खरसुंडी, ता. आटपाडी), देवदास महादेव तुपे (वय २१, रा.पालवण, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४१ किलो गांजा, २ चारचाकी, १ बुलेट, १० मोबाईल असा ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत हातकणंगले-कुंभोज रस्त्यावर नेज गावचे हद्दीत दोघेजण चारचाकी वाहनातून इचलकरंजीतील काहीजणांना गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दोन पथकांसह सापळा रचून कारवाई केली. यावेळी इचलकरंजीतील दिपक पुजारी व विवेक शिंदे यांच्यासह गांजी विक्रीसाठी आलेल्या मनोज गोसावी राजु शेख , अंकुश शिंदे व नंदकिशोर साठे या चौघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून २१ किलो ७० ग्रॅम गांजा, १ महिंद्रा बोलेरो, १ बुलेट तसेच ५ मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असा १६ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरचा गांजा कोठून आणला या संदर्भात त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत शिंदे व साठे यांनी हा गांजा खरसुंडी (जि.सांगली) येथून आणल्याची माहिती दिली. त्यानुसार खरसुंडी येथून मनोज गोसावी, राजु शेख, महेश साळुंखे व देवदास तुपे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २० किलो १२५ ग्रॅम गांजा, १ टाटा झेस्ट गाडी, ५ मोबाईल व रोख रक्कम असा १४ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
गांजाची खरेदी-विक्रीसाठी तस्करी करणाऱ्या इचलकरंजी, सांगली, सातारा व सोलापूर येथील ८ जणांना पकडून तब्बल ४१ किलो १९५ ग्रॅम गांजा, २ चारचाकी वाहने, १ बुलेट, ९ मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ३० लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या सर्वांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, प्रदिप पाटील, योगेश गोसावी, संतोष बरगे, अरविंद पाटील, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, अशोक पोवार, गजानन गुरव, महादेव कुराडे,राजेश राठोड, हंबीरराव अतिग्रे व राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने केली.
संशयीतांची न्यायालयाकडून सुटका
दरम्यान अटक केलेल्या सर्व संशयीतांना न्यायालयात हजर केले. यावेळी सुनावणी दरम्यान सर्व संशयीतांना अटकेच्या कारवाईबाबत प्रश्न चिन्ह निर्णय केल्यावर संशयीतांची अटक ही बेकायदेशीर असल्याचा युक्तीवाद संशयीत आरोपींचे वकील अॅड. सचिन माने यांनी केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संशयीतांना अटकेची कारणे दिलेली नसल्याने त्यांची तात्काळ मुक्तता करावी अशी विनंती केली. यावर न्यायालयाने तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त असल्याने तसेच एन.डी.पी.एस. कायद्याखाली गुन्हा नोंद असल्याने न्यायालयात वकील व पक्षकारांनी गर्दी केली होती. अॅड सचिन मानेंसह अॅड ओंकार कुरडे, अॅड संकेत परमाजे यांनी काम पाहिले.
