शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हटले जाते. अनेक चढ उतार करून तो शेत माल पिकवत असतो. मात्र पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेतीतील कामे करण्यासाठी एका भन्नाट जुगाड केला आहे. पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर पठारावर शेतकरी संतोष जंगम याच्या जिद्दीने नवा इतिहास घडला आहे. सुमारे ४,६०० फूट उंचीवर असलेल्या या पठारावर, खडतर डोंगरकड्यांतून दोन टन वजनाचा ट्रॅक्टर चढवण्याची अवघड मोहीम यशस्वी झाली आहे. ही घटना शेतीसाठीच्या तळमळीचा आणि सामूहिक प्रयत्नांचा अनोखा आदर्श ठरली आहे.
संतोष याने नुकताच ७०० एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर खरेदी केला. मात्र, पठारावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने हा ट्रॅक्ट रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी पूर्णपणे वेगळा करण्यात आला. त्याचे भाग लोखंडी शिडीच्या सहाय्याने डोंगर चढवण्याचे आव्हान स्वीकारले गेले. या मोहिमेत २०-२५ ग्रामस्थांनी सहभाग घेतला. ट्रॅक्टरचे प्रत्येक भाग डोके आणि खांद्यावर घेऊन, अत्यंत खडतर परिस्थितीत ते पठारावर पोहोचवले. विशेष म्हणजे, ट्रॅक्टरसह ट्रॉलीदेखील वर नेऊन पुन्हा जोडण्यात आली.
दरम्यान, ही मोहीम केवळ तांत्रिक यशस्वीताच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या चिकाटी आणि एकजुटीचे प्रतीक आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आधुनिक शेतीचा मार्ग मोकळा करणाऱ्या संतोष याच्या या कृतीने नव्या पिढीला प्रेरणा दिली आहे. रायरेश्वरच्या या घटनेने शेतीच्या क्षेत्रात जिद्द आणि मेहनतीचे नवे पर्व सुरू केले आहे. त्यांच्या या जुगाडाची भन्नाट चर्चा होऊ लागली असून त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.