विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गटातील नेत्यांमध्ये आपल्या उमेदवारीसाठी दावेप्रति दावे सुरु आहेत. त्यानुसार खानापूर आटपाडी मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते सुहासभैय्या बाबर भाजपचे आमदार गोपीचंदजी पडळकर आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते वैभव दादा पाटील यांच्या तिकिटासाठी हेवेदावे सुरू आहेत.
अशातच सुहासभैय्या बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीचा उमेदवार मीच आहे त्यामुळे विरोधकांनी अन्य पक्षातून किंवा अपक्ष लढण्यासाठी तयारी ठेवावी असे वक्तव्य करून विरोधकांना आव्हान दिले. महायुतीच्या या तिन्ही नेत्यांमध्ये उमेदवारीवरून जोरदार हेवेदावे सुरू असताना दुसरीकडे मात्र तिन्ही नेते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुतीसाठी काम करत आहेत.
परंतु लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नाव नोंदणी करून गावागावात संपर्क वाढवण्यासाठी या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात या संपूर्ण राजकारणाला कशी कलाटणी मिळणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.