‘विराटने IPL ट्रॉफीसाठी 18 वर्ष वाट पाहिली पण सचिन तर…’,

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची इंडियन प्रिमिअर लीगचा (IPL) चषक जिंकण्याची इच्छा 3 जून रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पूर्ण झाली. तब्बल 18 वर्षानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पहिल्यांदाच आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यांनी अंतिम सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाचा 6 धावांनी पराभव करत हे ऐतिहासिक यश मिळवलं. 2008 पासून एकाच संघासाठी खेळणारा एकमेव खेळाडू म्हणून विराट कोहलीकडे पाहिलं जातं. यंदाच्या विजयापूर्वी तीनवेळा अंतिम सामन्यात पोहचूनही आरसीबीला तीनदा अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं होतं. मात्र यंदा आरसीबीला चषक जिंकण्यात यश आलं.

अंतिम सामन्यामध्ये विराटने 35 बॉलमध्ये 43 धावा केल्या. तो या सामन्यात आरसीबीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटच्या नावाला शोभणारी ही आक्रमक खेळी नव्हती. तरीही या खेळीमुळे आरसीबीला पंजाबविरुद्ध 20 ओव्हरमध्ये 9 बाद 190 धावा करता आल्या. पंजाबला 184 पर्यंत मजल मारता आली आणि आरसीबीसाठी हा सामना ऐतिहासिक ठरला. आरसीबीच्या या विजयानंतर भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने कोहलीचं कौैतुक केलं आहे. भारतीय संघाबरोबरच दिल्लीकडून खेळताना विराटसोबत खेळलेल्या सेहवागने विराटचं कौतुक करताना सचिन तेंडुलकरचाही उल्लेख केला आहे.

सेहवागला विराट कोहलीला आयपीएल चषक जिंकण्यासाठी एवढा वेळ वाट पहावी लागली असा संदर्भ देत प्रश्न विचारला असता सेहवागने लगेच सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं. सचिन तेंडुलकरनेही एकिदवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी बरीच वाट पाहिली आणि हा कालावधी विराटने आयपीएल जिंकण्यासाठी जी वाट पाहिली त्यापेक्षा नक्कीच अधिक होता असं सेहवाग स्पष्टपणे म्हणाला. एवढा काळ वाट पाहूनही सचिनने जिंकण्याची अपेक्षा सोडली नव्हती, असं सेहवागने आवर्जून सांगितलं.

“त्याने (विराटने) ट्रॉफीसाठी 18 वर्ष वाट पाहिली पण सचिन तेंडुलकर तर 1989 पासून 2011 पर्यंत वाट पाहत होता. त्यामुळे कोहलीला जितका काळ वाट पहावी लागली तो सचिनपेक्षा कमीच आहे. तरीही सचिनने कधीच ट्रॉफी जिंकण्याच्या आशा सोडल्या नाहीत. त्याने त्याच्या मनात निश्चित केलं होतं की वर्ल्ड कपची ट्रॉफी हातात असेल तेव्हाच मी कायमच क्रिकेटचं मैदान सोडणार,” असं सेहवाने क्रिकबझशी संवाद साधताना म्हटलं.

सेहवागने पुढे बोलताना विराट कोहली मनात कोणताही किंतू-परंतू न ठेवता निवृत्ती घेऊ शकतो. त्याने हा निर्णय कधीही घेतला तरी हरकत नाही असं सेहवाग म्हणाला आहे. “जे सचिनसोबत झालं तसाच प्रकार विराटचा आहे. आता त्याला फार दिलासा मिळाला असेल. तो आता कधीही आयपीएलमधून निवृत्त होऊ शकतो. तो निर्णय त्याला कधीही घेता येईल. कोणताही खेळाडू चषक जिंकण्यासाठीच खेळतो. पैसा येतो आणि जातो. मात्र चषक जिंकणं सोपं नाही. कोहलीची प्रतिक्षा संपली असली तरी त्याने या विजयामध्ये मोठं योगदान दिलं असल्याने तो पुढेही खेळत राहिल्यास हरकत नाही,” असं सेहवाग म्हणाला.